6 जुलैपर्यंत धो-धो बरसणार! मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सूनचा हाहाकार; तुमच्या जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट' आहे का?

Maharashtra Weather Update: मुंबई महाराष्ट्रात कुठे-कुठे 6 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे आणि प्रशासनाने काय सल्ला दिला आहे, याची संपूर्ण माहिती येथे वाचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांना 6 जुलैपर्यंत ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे?"
NDTV Marathi

Rain 2026 Updates: महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा (ऑफ-शोअर ट्रफ) सक्रिय असून मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण परिसरातून पसरली आहे. या हवामान प्रणालीमुळे राज्यातील अनेक भागांत 6 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबईसह राज्यभरात 6 जुलैपर्यंत पावसाची काय परिस्थिती असणार? Maharashtra Monsoon Update 2026

  1. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 
  2. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ते बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज असून विदर्भात जवळपास सर्वच भागांत व्यापक पाऊस होण्याची शक्यता आहे. 
  3. मराठवाड्यात 2 जुलै आणि 3 जुलै रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून अन्य दिवशी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव दत्तात्रय कदम यांनी कळवले आहे.
  4. 2 जुलै ते 4 जुलैदरम्यान कोकणातील काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 2 जुलै आणि 3 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 
  5. 4 जुलै ते 6 जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. याशिवाय 1 जुलै ते 4 जुलै या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

...धोका वाढू शकतो, प्रशासनाचे आवाहन

मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, शहरी भागातील रस्ते जलमय होणे तसेच घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक आणि रस्त्यांची अद्ययावत माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अरबी समुद्रातील प्रतिकूल हवामानामुळे मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

(नक्की वाचा : मुंबई, नवी मुंबईत जोरदार पाऊस! अंधेरी सब वे पाण्याखाली; वाहतुकीचा खोळंबा, कुठे काय स्थिती? वाचा..)

शेतीविषयक सल्ला देताना, भातशेती आणि भाजीपाल्याच्या रोपवाटिकांमधील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुसळधार पावसाच्या काळात जनावरांना सुरक्षित गोठ्यात ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला पशुपालकांना देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट कुठे आणि कधी?

1 जुलै : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली
2 जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा
3 जुलै : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर
4 जुलै : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

रायगड जिल्ह्याला 2 जुलै रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.