Rain Alert: कुठे यलो तर कुठे रेड अलर्ट! उष्णतेमुळे विदर्भाची होतेय भट्टी तर 'या' 5 जिल्ह्यांत पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: हवामान विभागाने 5 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट कायम आहे. सविस्तर माहितीसाठी नक्की वाचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Maharashtra Weather Update: राज्यातील 5 जिल्ह्यांना पावसाचा इशारा"
Canva

- यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Rain Yellow Alert: राज्याच्या काही भागात सूर्य अक्षरशः आग ओकतोय तर काही ठिकाणी हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भामध्ये उष्णतेचा दाह वाढलेला असताना काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावू शकतो.  

  • कोल्हापूर
  • सांगली
  • सोलापूर
  • लातूर
  • धाराशिव

या पाचही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.  

Advertisement

(नक्की वाचा : Nagpur News: नागपुरात उन्हाचा हाहाकार! 9 दिवसांत तब्बल 26 अज्ञात मृतदेह सापडले; उष्माघाताने बळी गेल्याची चर्चा)

एका बाजूला पाऊस, तर विदर्भात 'रेड अलर्ट'

राज्यात एका बाजूला पावसाचे वातावरण तयार होत असताना, विदर्भाची मात्र सध्या भट्टी झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. गुरुवारी (21 मे) विदर्भात तीव्र उष्णतेची लाट नोंदवली गेली असून, हवामान विभागाने शुक्रवार (22 मे) आणि शनिवार (23 मे) अशा दोन्ही दिवशी विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.