Navi Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (22 जानेवारी 2026) नवी मुंबईजवळ 'इनोव्हेशन सिटी' उभारण्याची घोषणा केली. याद्वारे नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देऊन अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. IANS वृत्तसंस्थेशी बातचित करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने जगभरातून आलेल्या 450 गुंतवणूकदारांसमोर नवी मुंबईजवळ इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांनी आवड दर्शवलीय. तसेच टाटा समूह या इनोव्हेशन सिटीमध्ये सुमारे एक लाख कोटी रुपये (11 अब्ज डॉलर) गुंतवणूक करण्याची योजना आखत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तिसऱ्या मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ही इनोव्हेशन सिटी मुंबईमध्ये जागतिक इनोव्हेशन इकोसिस्टम आणण्यास मदत करेल. आमचे उद्दिष्ट मुंबईला एक असे केंद्र बनवण्याचे आहे, जिथे जगातील कोणतीही व्यक्ती सहजपणे ‘प्लग-अँड-प्ले' इनोव्हेशन सिस्टीमचा वापर करू शकेल. त्यामध्ये डेटा सेंटरचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येऊ घातलेल्या 'तिसऱ्या मुंबई'मध्ये टाटा सन्सच्या माध्यमातून इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. भविष्यसज्ज शहरांसाठी ही इनोव्हेशन सिटी महत्त्वाची असणार आहे. यासह रायगड-पेण येथे ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे. बीकेसीप्रमाणे रायगड-पेण येथे एमएमआरडीए आणि खासगी सेक्टरच्या सहकार्याने व्यावसायिक केंद्र उभारले जाणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी यात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
(नक्की वाचा: महाराष्ट्राचे दावोसमध्ये 30 लाख कोटींची सामंजस्य करार, CM देवेंद्र फडणवीसांची माहिती)
मुंबई शहरासंदर्भात मोठी घोषणा
'वर्ल्ड इकोनॉमिक फोरम 2026'मध्ये मुख्यमंत्र्यांनी मुंबईला सर्क्युलर इकॉनॉमी शहर बनवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील घनकचरा, द्रव कचरा, वैद्यकीय कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, बांधकाम साहित्याचा कचरा आणि इतर प्रकारचा कचरा सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून पुनर्वापरयोग्य करण्यात येईल. यामुळे मुंबईच्या हवेच्या आणि पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होईल तसेच देशाची आर्थिक राजधानी एक शाश्वत शहर म्हणून विकसित होईल.
केवळ मुंबई मेट्रोपॉलिटन परिसरच नव्हे तर, कोकण, मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागात गुंतवणूक येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, अहिल्यानगर, नंदूरबार आणि धुळे या भागात देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे.