विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण करण्याचं काम भाजपकडून सुरु आहे, असा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. निवडणूक आयोगाच्या कामात पारदर्शकता नाही. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरु आहे, असा गंभीर आरोप शिवेसना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
देशातील निवडणुका निष्पक्षपणे घेण्याच्या अधिकारांचं राज्यात उल्लंघन सुरु आहे. निवडणुकीत आपण विजय होऊ शकत नाही, पराभवाला घाबरून या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकशाहीविरोधात मोठं कारस्थान सुरु केलं आहे. याचीच तक्रार घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला भेट दिली. काही मतदारसंघ त्यांनी ठरवले आहेत, जवळपास 150 मतदारसंघ आहेत. त्यासाठी विशिष्ट अॅपची निर्मिती करून आमचे (महाविकास आघाडी) किमान 10 हजार मतं यादीतून काढायची आणि त्याजागी बाहेरील बोगस मतदारांची नावे त्यात टाकायची, असं षडयंत्र भाजपकडून सुरु आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या टीम काम करत आहेत. या सर्वाचे सूत्रधार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. हा तांत्रिक मुद्दा असला तरी महाराष्ट्राच्या भविष्याचा मुद्दा आहे. हे षडयंत्र आम्ही उघड पाडूच शिवाय लोकांमध्ये जागृती निर्माण करु. वेळ पडली तर महाराष्ट्रीतील मतदारांचा विराट मोर्चा निवडणूक आयोगावर काढावा लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
बाहेरच्या राज्यातील लोकांचे आधारकार्ड जोडून त्यांची नावे मतदार याद्यांमध्ये जोडली जात आहे. राज्यातील काही अधिकारी या पापात सामील आहेत. राज्यातील मुख्य निवडणूक आयुक्तांना याबाबत भेट घेऊन माहिती दिली आहे. आज निवडणूक आयोगाला मेल देखील करणार आहोत. पारदर्शक निवडणुका व्हाव्यात असं केंद्रीय निवडणूक आयोगाना निवडणुका जाहीर करताना सांगितलं होतं. मात्र तसं होताना दिसत नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
निवडणूक आयोग हे नरेंद्र मोदींच्या पायाशी बसलेलं आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक आयोग पारदर्शी नसेल, महाराष्ट्रातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम सुरु असेल तर महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.