
Phule Movie : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्षावर आधारित 'फुले' चित्रपट 25 एप्रिल रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात फुले दाम्पत्याचे सामाजिक अनिष्ठ प्रथा, निरक्षरता आणि असमानता या विरुद्धचे योगदान दाखवण्यात आले आहे. फुले चित्रपट गरीब, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिलांमध्ये शिक्षण आणि जागरूकता पसरवणाऱ्या फुले दाम्पत्याचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवेल. या उद्देशाने चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी लढणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा संघर्षमय प्रवास प्रत्येकाने अनुभवायला हवा. या चित्रपटातून समाज उन्नतीसाठी उभारलेल्या चळवळीचा जिवंत इतिहास पहायला मिळतो. परिवर्तनवादी, पुरोगामी महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटला पाहिजे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटीलांनी मुख्ममंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?
25 एप्रिल 2025 रोजी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा 'फुले" हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला असून प्रेक्षकांची मोठी पसंती या चित्रपटाला मिळत आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांना पहायला मिळावा म्हणून टॅक्स फ्री करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.
(नक्की वाचा- Phule Movie 'मी स्वतः ब्राह्मण, माझ्याएवढा स्ट्राँग...' फुले चित्रपटावर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा)
महोदय, दलितांना पाण्याचा हौद खुला केला, शिक्षणासाठी दारे उघडे केली, स्त्री शिक्षणासाठी पाऊल टाकले इतकाच मर्यादित महात्मा फुले आणि सावित्रीमाईचा इतिहास नाही. तर त्याहूनही व्यापक काम महात्मा फुले आणि सावित्रीमाईनी करून ठेवले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका अफाट आहे की जसा 19 व्या शतकात त्यांच्या कार्याला विरोध केला गेला, तितकाच विरोध 21 व्या शतकात त्यांच्या चित्रपटाला झाला. परिणामी चित्रपटातील जवळपास 12 सीन्स सेन्सॉर बोडोंने कापले. परंतु महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईचे विचार तोकडे पडले नाहीत.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी लढणाऱ्या जोडप्याचा हा संघर्ष प्रवास प्रत्येकाने पाहायला हवा. त्यांच्याविषयी अपप्रचार करणा-या जबाबदार व्यक्तींना सुद्धा हा चित्रपट आवर्जून दाखवावा, त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील, या चित्रपटातून आपल्याला समाज उन्नतीसाठी उभारलेल्या चळवळीचा जिवंत इतिहास पहायला मिळेल. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की "फूले" चित्रपट टॅक्स फ्री करत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिवर्तनवादी, पुरोगामी महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटला पाहिजे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world