गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Malvan Sea Viral Video : मालवण येथील समुद्रात आज सोसाट्याचा वारा आणि समुद्रातील रौद्ररूप धारण केलेल्या अजस्त्र लाटांच्या तडाख्याने पोलिसांची ‘नेपोलियन'ही गस्तीनौका समुद्रात बुडाली. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस किनाऱ्यापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली. सुदैवाने या नौकेवरील सर्व कर्मचारी सुरक्षित असून मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ‘नेपोलियन' ही पोलीस गस्तीनौका सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागील भागात नियमित गस्त घालत होती.सध्या समुद्रात सोसाट्याचा वारा वाहत असल्याने लाटांचा जोर प्रचंड वाढला आहे. गस्त घालत असतानाच एकापाठोपाठ एक आलेल्या अजस्त्र लाटांनी नौकेला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नौकेत पाणी शिरले आणि पाहता पाहता नौका समुद्रात बुडू लागली.
नौका बुडत असल्याचे लक्षात येताच नौकेवरील पोलीस कर्मचारी आणि खलाशी यांनी प्रसंगावधान राखत बचावासाठी हालचाली सुरू केल्या. घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी तात्काळ मदतकार्य सुरु केलं. त्यांनी स्थानिक मच्छिमार योगेश तोडणकर यांची नौका घेऊन समुद्रात धाव घेतली. या बचावकार्यात विली डिसोझा,नॉवेल फर्नांडिस,होमगार्ड जॉयल फर्नांडिस,खलाशी रॉनी, कुमार,लॉरेन्स,बेंडिट आणि इतर मत्स्य व्यावसायिक तरुणांनी सहभाग घेतला.