योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News Today : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राहीत गावात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत एका युवकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बीट जमादार व कर्मचारी नियमित गस्त घालत असताना चार वाजताच्या सुमारास अनिल वाहूरवाघ या युवकाने अचानक घोषणाबाजी सुरू केली. “अधिकारी भ्रष्टाचार दडपतात,आता मला जगायचे नाही,”अशी आरोळी देत त्याने प्लास्टिक कॅनमधील ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला.घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला पकडले आणि कॅन दूर फेकून दिला. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि त्या तरुणाचा जीव वाचला.
नक्की वाचा >> Pune News: पत्रकारांवर बहिष्कार,आयुक्तांच्या एका सूचनेमुळे इतिहास घडला, पिंपरी-चिंचवड महापालिकेत काय शिजतंय?
तरुणाच्या तक्रारींकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, नंतर असं काही घडलं..
तरुणाने जिल्हा व तालुका प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी केली होती.परंतु, प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप त्याने केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचंही त्या तरुणाने म्हटलंय. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे अधिकारी,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर तरुण व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.या घटनेमुळे तालुक्यातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार का?याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world