सह्याद्री हॉस्पीटल आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये 6400 कोटींचा व्यवहार झाला. सह्याद्री हॉस्पीटल साखळी समूहातील हिस्सा मणिपाल हॉस्पिटलने विकत घेण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री हॉस्पिटल ज्या जागेवर उभे आहे ती कोकण मित्र मंडळाला दीर्घकालीन वापरासाठी नाममात्र दराने भाडेतत्वावर दिली होती. ही जागा विकताही येणार नाही आणि भाड्यानेही देता येणार नाही अशी अट असतानाही सह्याद्री आणि मणिपाल हॉस्पिटल यांच्यात करार कसा झाला ? असा प्रश्न सजग पुणेकरांनी विचारण्यास सुरुवात केल्यानंतर प्रशासन जागे झाले होते. आता या सगळ्या वादामध्ये अभिनेत्री राधिका आपटे हिचेही नाव आले असून, तिचे नाव घेत काही प्रश्न विचारण्यात येऊ लागले आहेत.
सह्याद्री-मणिपाल डीलबाबत प्रश्नांचे मोहोळ
माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सजग पुणेकर विजय कुंभार यांनी X वर एक पोस्ट करत राधिका आपटेच्या नावाचा उल्लेख केला आहे. सह्याद्री हॉस्पिटल ज्यांनी उभारले त्या चारुदत्त आपटे यांची राधिका आपटे ही कन्या आहे. कुंभार यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये म्हटले आहे की " डॉ. चारुदत्त आपटे हे कोकण मित्र मंडळाचे विश्वस्त आणि सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अशा दोन्ही पदांवर कार्यरत होते. हीच व्यक्ती या व्यवस्थेच्या दोन्ही बाजूंनी होती! 1996 ते 2023 पर्यंत डॉ. आपटे सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही कार्यरत होते, हीच कंपनी महानगरपालिकेच्या भाडेपट्ट्याच्या जमिनीवर रुग्णालय चालवत होती. 2006 मध्ये ट्रस्ट आणि सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अधिकृतरित्या संबंध प्रस्थापित झाले. "
( नक्की वाचा: सह्याद्री हॉस्पीटलची जागा महापालिकेचीच! 6400 कोटींचा व्यवहार अडचणीत येणार? )
वादाशी राधिका आपटेचा काय संबंध?
कुंभार यांनी पुढे म्हटले आहे की, "2006 पासून, या रुग्णालयाचे अधिकार खासगी इक्विटी कंपन्यांना विकण्याचे सत्र सुरू झाले. एव्हरस्टोन, ओंटारियो टीचर्स' आणि आता मणिपालला हॉस्पिटल विकण्यात आले. मात्र ज्या जागेवर हे हॉस्पिटल उभे आहे ती जमीन मात्र सार्वजनिक मालमत्ता म्हणून कायम आहे. अभिनेत्री राधिका आपटे यांचा संबंधही या प्रकरणात समोर आला आहे. त्या डॉ. आपटे यांच्या कन्या असून, त्यांनी कोकण मित्र मंडळाच्या विश्वस्त म्हणूनही काम केले आहे. धर्मादाय गोष्टी आणि नफा यांतील फरक धूसर झाला असून राधिका आपटे या विश्वस्त म्हणून काम करणे ही बाब या सगळ्यावर विशिष्ट कुटुंबाचे नियंत्रण असल्याकडे बोट दाखवते'