राहुल कांबळे, नवी मुंबई
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या घातपाताचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, या प्रकरणात धनंजय मुंडेंना 'क्लीन चिट' दिली जात असल्याचा आरोप करत, मनोज जरांगे पाटलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे.
घातपाताचा गंभीर आरोप
जरांगे पाटील यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि जालना पोलीस अधीक्षक यांना उद्देशून जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी माझी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिली होती. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनी ही कबुली दिली आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
(नक्की वाचा- Gadchiroi New: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचं अपघाती निधन; काही दिवसांपूर्वीच केला होता पक्षप्रवेश)
नार्को टेस्टची तयारी
मनोज जरांगे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची सत्यता सिद्ध करण्यासाठी नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली आहे. "नार्को टेस्टसाठी मी तयार आहे. मी सगळ्यात आधी अर्ज केला आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यांनी पोलीस संरक्षण सुद्धा घेतले नसल्याचे सांगितले.
धनंजय मुंडेंच्या चौकशीची मागणी
जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावण्याची मागणी केली आहे. "धनंजय मुंडे यांना चौकशीला बोलवा. नाही बोलवले तर भारी पडेल," असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस चांगले असले तरी ते *चुकीच्या लोकांना पाठीशी घालत आहेत'*, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Akola News : घरात लागली भीषण आग! सरकारी रुग्णावाहिका न पोहोचल्याने आजीबाईंचं 'आरोग्य' धोक्यात)
मराठा आरक्षणासाठी दिल्लीमध्ये धडक देण्याचा विचार असून, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे जरांगे यांनी सांगितले. सरकारवर टीका करतान त्यांनी म्हटलं की, काँग्रेसची बलाढ्य सत्ता गेली, भाजपची सुद्धा जाऊ शकते." असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
जरांगे पाटील यांनी भाजप सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. वाल्मिकी कराड याला लवकरच जेलमधून सोडले जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामागे फडणवीस सरकार आहे. अशा लोकांना आमच्यावर सोडा, पाहून घेऊ आम्ही, असे आव्हान जरांगे पाटलांनी दिले.