सुरज कसबे
मोकाट कुत्र्यांनी सध्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. चिंचवड आणि थेरगाव परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याला आळा घालण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने अधिकाऱ्याला चक्क प्रतिकात्मक कुत्रा भेट दिला. त्यामुळे मनसेच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.
शहरातील चिंचवड आणि थेरगावच्या अनेक भागांमध्ये या भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास आहे. केशवनगर, तालेरानगर, डांगे चौक आणि गणेशनगरमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. ही कुत्री पादचारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. अनेकदा ही कुत्री लहान मुले आणि ज्येष्ठांवर हल्ला ही करतात. तसेच काही वेळा चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे नागरिकांची झोपमोड होते. लहान मुलांना भीती वाटते. कुत्र्यांमुळे परिसरात एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. रात्रीच्या शिफ्टमध्ये कामावर जाणाऱ्या कामगारांच्या वाहनांमागे कुत्री धावतात. ज्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पशुवैद्यकीय विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
याबाबत 'सारथी' ॲपवरून अनेक वेळा तक्रारीही नोंदवण्यात आल्या आहोत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप मनसेनं केला आहे. या पार्श्वभूमीवर, मनसैनिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यावेळी त्यांना प्रतिकात्मक कुत्रा ही भेट दिला. शिवाय या समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी ही केली आहे. जर यावर तात्काळ उपाययोजना केली नाही, तर पुढच्या वेळी खऱ्या कुत्र्यांना पकडून महापालिका कार्यालयात सोडले जाईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.