रिझवान शेख, ठाणे
Thane news : ठाणे स्टेशन परिसरात मराठी तरुणाला मारहाण परप्रांतीयांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मोबाईल दुकानात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झालेल्या तरुणाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी 08.00 वाजेच्या सुमारास ठाणे स्टेशन परिसरात तीन ते चार परप्रांतीयांकडून एका मराठी युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत मराठी तरूण हा गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मारहाणीनंतर स्टेशन परिसरात प्रचंड गर्दी जमली होती. मराठी तरुणाला परप्रांतीयानी मारले म्हणून रस्त्यावरून येणारी जाणारी मराठी जनता मारहाण झालेल्या मराठी युवकाच्या सोबत उभी राहिली. यामुळे काही काळ ठाणे स्टेशन परिसरात तणावपूर्ण परिस्थिती होती. ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस त्वरित घटनास्थळी आले त्यांनी मराठी तरुणाला वाचवले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली व मारहाण झालेल्या मराठी युवकाला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.
प्राथमिक माहितीनुसार मारहाणीत जखमी झालेला मराठी युवक ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरामध्ये राहतो. तो दररोज ठाणे स्टेशनवरून प्रवास करत असतो. ठाणे स्टेशनहून लोकमान्यनगरला आपल्या घरी जात असताना त्याचा रिचार्ज संपला म्हणून तो ठाणे स्टेशनजवळील मोबाईल शॉपमध्ये गेला. दुकानात त्याला बराच वेळ ताटकळत थांबावं लागलं. नंतर या दुकानात रिचार्ज नाही असं दुकानदाराने त्याला सांगितलं.
यावर त्याने एवढ्या मोठ्या दुकानात रिचार्ज नाही, असं विचारल्यावर दुकानदार आणि त्याच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. काही क्षणात याचं रूपांतर वादात झालं. यावरून दुकानात काम करणाऱ्या परप्रांतीय मुलांनी या मराठी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनांमुळे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संतापाची लाट पसरलेली पाहायला मिळाली. या परप्रांतीयांवर कठोर कारवाई करावी, अशी देखील मागणी लोकांद्वारे केली जात आहेत. नौपाडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.