अमेरिका येथे आंबा निर्यातीसाठी आंब्यातील कोयकिड्याचा अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निर्यातीपूर्वी आंब्यावर विकिरण प्रक्रिया सुरळीत चालू आहे. 11 मे 2025 पासून पुनश्च निर्यात सुरळीत झाल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. अमेरिकेला आंबा निर्यातीसाठी विकिरण प्रक्रिया बंधनकारक आहे. त्यानुसार पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून अमेरिकन निरीक्षकाच्या उपस्थितीमध्ये 1 एप्रिल 2025 पासून ही प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यांच्या तपासणीअंती आंब्याची निर्यात केली जाते. 8 व 9 मे 2025 रोजी निर्यात झालेल्या काही कन्साईनमेंट मधील त्रुटीमुळे सदर आंबा कन्साईनमेंट अमेरिका येथे थांबवण्यात आला. अशा आशयाच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या असून याबाबत कृषी पणन मंडळाकडून या बाबींच्या तपासणीचे कामकाज प्रगतीपथावर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
8 व 9 मे 2025 रोजी सुविधेवरील विकीरण प्रक्रियेची कॉम्पुटराईज्ड स्काडा सॉफ्टवेअरमधील माहितीची तपासणी केली असता किमान व कमाल डोस हा विहित मर्यादेमध्ये आढळून आलेला आहे. आंब्याला विकीरण प्रक्रिया व्यवस्थितरित्या, परिणामकारक व नियमानुसार पुर्ण झालेली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर अमेरिकन निरीक्षकांनी तपासणी व खात्री करून, डोझीमीटरचे रीडिंग मधील किमान व कमाल डोस हा विहित मर्यादेत योग्य असल्यामुळे निर्यातीकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र स्वाक्षरी करून दिलेले आहे. त्यानंतर आंबा अमेरिका येथे निर्यात झालेला आहे.
अमेरिकन निरीक्षक यांनी 8 व 9 मे २०२५ रोजी प्रक्रिया केलेल्या, अमेरिकेमध्ये पोहोचलेल्या 15 कन्साईनमेंटच्या डोजीमेट्री मध्ये काही त्रुटी आहेत असे कळविल्यामुळे 10 निर्यातदारांच्या एकूण 25 मे. टन आंब्याच्या कन्साईनमेंट्स अमेरिकेमध्ये नाकारण्यात आल्या. मात्र विकीरण प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आढळल्यास, त्याबाबत त्रूटी सुविधा केंद्राच्या निदर्शनास आणून देण्याबाबत, त्रुटी दुरुस्त करण्याबाबत त्यांना संधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी तरतूद आहे. मात्र, अमेरिकन निरीक्षकांनी असे न करता, इतर संबंधित यंत्रणांशी विचारविनीमय न करता थेट त्यांच्या अमेरिकेमधील वरीष्ठ कार्यालयास कथीत त्रुटींबाबत सांगितले. त्यामुळे सदर 15 कन्साईनमेंट्स अमेरीकेमध्ये नाकारण्यात आल्या. सुविधेवरील अमेरीकन निरीक्षकांनी प्रमाणपत्र-203 देण्यापुर्वी सदर त्रुटी सुविधेवरील संबंधीत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्रुटींची पुर्तता करण्याकरिता संधी दिली असती तर आंब्याच्या निर्यातीमधील नुकसान टाळता आले असते.
वाशी येथील सुविधेवरुन 11 मे 2025 पासून 18 मे 2025 पर्यंत सुमारे 39 कन्साईनमेंट द्वारे 53 हजार 72 बॉक्सेस आंबा अमेरीका येथे निर्यात करण्यात आला आहे. हा आंबा अमेरिकन बाजारपेठेमध्ये विक्री केला जात आहे. सदर आंब्यामध्ये राज्यातील हापूस, केशर, पायरी तर दक्षिण भारतामधील बैगनपल्ली, हिमायत व इतर वाणांची आंबा निर्यात सुरु आहे. उत्तर भारतामधील रसालु, लंगरा, चौसा, दशहरी आदी आंबा देखील विकीरण प्रकिया करुन निर्यात सुरळीत सुरु आहे. सद्यस्थितीत वाशी येथील विकीरण सुविधेवरुन आतापर्यंत 1 हजार 413 मे. टन आंब्याची अमेरिका येथे निर्यात झाली आहे. सुमारे 2 हजार मे. टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया येथे 27 मे. टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. असे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी सांगितले आहे.