
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस तिच्याकडे सातत्याने चौकशी करत आहेत. तिच्याकडून जास्तीत जास्त माहिती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ पोलीसच नाही, तर इतर विविध एजन्सीजही ज्योतीवर प्रश्नांचा भडिमार करत आहेत. दरम्यान, इतर गुप्तहेरांचे ही अटकसत्र सुरूच आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या (Pakistan Spy) प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या यादीत विविध प्रकारचे लोक आहेत. त्यात यूट्यूबर, विद्यार्थी, व्यावसायिक, सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. ते पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचं ही समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्योतीसह इतर गुप्तहेरांना विचारले जाणारे हे 12 प्रश्न:
प्रश्न क्र. 1: पाकिस्तानला कधी-कधी गेलात आणि तिथे कोणत्या लोकांशी भेटलात?
प्रश्न क्र. 2: आणखी कोण-कोण पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या संपर्कात आहे?
प्रश्न क्र. 3: दानिश, गजाला आणि यामीन यांचे काय कनेक्शन आहे?
प्रश्न क्र. 4: पाकिस्तानात किती लोकांना ओळखता?
प्रश्न क्र. 5: ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील पार्टीत कशी सहभागी झाली?
प्रश्न क्र. 6: पाकिस्तानी अधिकारी दानिशशी काय संबंध आहे, दानिशशी ओळख कधी आणि कशी झाली?
प्रश्न क्र. 7: पाकिस्तानात ज्योतीच्या राहण्याचा आणि फिरण्याचा खर्च कोण करत होता?
प्रश्न क्र. 8: ज्योतीच्या परदेश दौऱ्यांसाठी निधी कोठून येत होता?
प्रश्न क्र. 9: पाकिस्तानात ज्योतीला व्हीआयपी (VIP) ट्रीटमेंट का मिळत होती?
प्रश्न क्र. 10: ज्योतीला पाकिस्तानी पोलिसांचे संरक्षण का मिळत होते?
प्रश्न क्र. 11: ओडिशाच्या प्रियंकाशी ज्योतीचा काय संबंध आहे?
प्रश्न क्र. 12: ज्योती आणि गजाला पाकिस्तान उच्चायुक्तालयात का गेले होते?
ट्रेंडिंग बातमी - पाकिस्तानच्या गुप्तहेरांचे धक्कादायक जबाब, 'असे' अडकले दानिशच्या जाळ्यात
पाकिस्तानचे ते 12 गुप्तहेर कोण?
1)ज्योती मल्होत्रा
हरियाणामध्ये राहणाऱ्या ज्योतीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी (ISI) संबंधित असल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासानुसार, ती जानेवारीमध्ये पहलगामला गेली होती. तिथून गुप्त मार्गाने ती पाकिस्तानात पोहोचली. पहलगाम हल्ल्याशी तिचा काही संबंध आहे की नाही, याचा तपास सुरू आहे.
2)शहझाद
उत्तर प्रदेशातील रामपूरचा रहिवासी असलेला शहझाद व्यवसायाने व्यापारी आहे. भारत-पाक दरम्यान तो सौंदर्यप्रसाधने आणि मसाल्यांचा व्यापार करतो. याच व्यवसायाच्या नावाखाली तो आयएसआयसाठीही काम करत असल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश एटीएसने त्याला मुरादाबादमधून अटक केली आहे.
3)देवेंद्र सिंग
देवेंद्र एका माजी लष्करी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्याला हरियाणातील कैथल जिल्ह्यातील मस्तगड गावातून पकडण्यात आले आहे. फेसबुकद्वारे तो एका पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात आला. तो 5 ते 10 हजार रुपयांच्या बदल्यात गोपनीय लष्करी माहिती पाठवत असे. त्याच्याकडून पोलिसांना संवेदनशील नकाशे आणि कागदपत्रे मिळाली आहेत.
4) नोमान इलाही
नोमान इलाहीला हरियाणातील पानिपतमधून अटक करण्यात आली आहे. तो एक 'डार्क वेब' (Dark Web) गुप्तहेर होता. नोमान व्यवसायाने कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. कामाच्या नावाखाली तो पाकिस्तानला भारतीय लष्कराच्या हालचालींची माहिती पाठवत असे. यूएसबी (USB) ड्राइव्ह आणि पैशांच्या बदल्यात संवेदनशील डेटा डार्कनेटवर अपलोड केल्याची कबुली त्याने स्वतः दिली आहे.
5)यामीन मोहम्मद
यामीन पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या दानिश नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. त्याच्यावर संशयास्पद हालचालींमध्ये सहभागी असल्याचा गंभीर आरोप आहे.
6)गजाला
गजालाला पंजाबमधील मलेरकोटला येथून पकडण्यात आले आहे. ती पाकिस्तानचा व्हिसा घेण्यासाठी अनेकदा उच्चायुक्तालयात जात असे. तिच्या या हालचाली संशयास्पद होत्या. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.
7)अरमान
अरमानला हरियाणातील नूह जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर व्हॉट्सॲपद्वारे भारताच्या लष्करी हालचालींची माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे. अरमानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
8)मुर्तजा अली
मुर्तजा अलीला गुजरात पोलिसांनी पंजाबमधील जालंधरमधून पकडले. तो स्वतः बनवलेल्या मोबाइल ॲपवरून पाक गुप्तचर संस्था आयएसआयला माहिती पाठवत असे. पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाइल आणि तीन सिमकार्ड जप्त केली आहेत.
9)नउमान इलाही
नउमान इलाहीला 15 मे रोजी हरियाणातील पानिपतमध्ये अटक करण्यात आली. तो उत्तर प्रदेशातील कैराना येथील रहिवासी आहे. एका कारखान्यात तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो पाकिस्तानशी संपर्कात होता आणि संवेदनशील माहिती पाठवत होता.
10)तारीफ
तारीफला हरियाणातील नूह येथून अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या दोन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे. हे अधिकारी त्याला सिमकार्ड देत असत. त्याला सिरसा येथे जाऊन विमानतळाची छायाचित्रे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
11)करनबीर सिंग
करनबीर सिंगला पंजाबमधील गुरदासपूरमधून अटक करण्यात आली आहे. तो आयएसआयच्या थेट संपर्कात होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो भारतीय लष्कराशी संबंधित माहिती त्यांना पाठवत असल्याचा आरोप आहे. करनबीरवर ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट (Official Secrets Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12)सुखप्रीत सिंग
सुखप्रीत सिंगने पंजाबमधील गुरदासपूरमध्ये लष्कराच्या हालचालींसह 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल गोपनीय माहिती आयएसआय ऑपरेटर्सना दिल्याचा आरोप आहे. या बदल्यात त्याला आयएसआय हँडलर्सकडून 1 लाख रुपयेही मिळाले होते. सुखप्रीत सिंगलाही अटक करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world