Pune News : पुण्यातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी, दुकानांबाहेर मोठी झुंबड; वस्तुंसाठी तब्बल 8 दिवसांचं वेटिंग

Pune News : गेल्या तीन दिवसांमध्ये मागणी अचानक वाढल्यामुळे त्यांना या वस्तू मिळण्यासाठी किमान आठ दिवस वाट पहावी लागणार आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : केंद्र सरकारच्या आदेशानंतर व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णतः बंद करण्यात आला आहे. देशातील विविध भागातील विद्यार्थी पुण्यात शिकण्यासाठी येत असतात. स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणार्थींचीही संख्या मोठी आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने कित्येक विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दरम्यान व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळतच नसल्यामुळे पुण्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट चालक आता पारंपरिक लाकडांची चूल, इलेक्ट्रिक इंडक्शन, आणि डिझेल भट्टीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे गॅस शेगडीला पर्याय म्हणून या वस्तूंच्या खरेदीसाठी पुणे शहरातील मंडईत एकच झुंबड उडाली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये मागणी अचानक वाढल्यामुळे त्यांना या वस्तू मिळण्यासाठी किमान आठ दिवस वाट पहावी लागणार आहे.  

Advertisement

२४ तासात ८५ टक्के हॉटेल बंद होण्याची भीती

पुण्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर मिळणं पूर्णपणे बंद झालंय. शहरातल्या एकाही गॅस केंद्रावर व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नाही. ज्या व्यावसायिकांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सिलिंडर घेऊन ठेवले होते, त्यांची सोय होऊ शकते. मात्र सध्या नव्या सिलिंडरची मागणी पूर्ण होणार नाही. या सगळ्यामुळे पुण्यातल्या हॉटेल व्यवसायिकांचे दोन दिवसांपासून मोठं नुकसान होतंय. मोठमोठ्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे. हॉटेलमधले मेन्यू कमी होतील. येत्या २४ तासात ८५ टक्के हॉटेल बंद होण्याची भीती आहे. 

एलपीजी गॅसचा पुरवठा कमी

गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅसचा पुरवठा कमी झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी २० ते २१ दिवसांनी गॅस सिलेंडरची मागणी करता येत होती, मात्र आता हा कालावधी वाढवून सुमारे २५ दिवसांपर्यंत करण्यात आला आहे. तसेच ज्या ग्राहकांनी केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांना गॅस सिलेंडर देण्यात येत नसल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे कमर्शियल गॅसचा पुरवठा तर यापूर्वीच बंद करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांसह अनेक लघु उद्योजक अडचणीत आले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी घरपोच मिळणाऱ्या गॅससाठी आता ग्राहकांना भर उन्हात गॅस एजन्सीसमोर तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीही व्यक्त होत आहे.