
मे महिना हा उन्हाळ्याचा महिना. या महिन्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. सूर्य आग ओकत असतो. आंब्याचा मोसम असल्यानं घरोघरी आमरसचा बेत रंगतो. यंदा मात्र चित्र काहीसं वेगळं आहे. यावर्षी मे महिन्यातच जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातच पावसाळा का आलाय? हा प्रश्न सर्वांना सतावतोय. त्याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मे महिन्यासाठी पाऊस नवा नाही. मे महिन्यात उन्हानं प्रचंड तापवलं, प्रचंड सतावलं, उन्हाचा पार वैताग आला की मग कुठे मे महिना सरता सरता थोडं वातावरण बदलतं आणि मान्सूनपूर्व पावसाची एखादी सर येते. पण यंदा मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं दमदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे.
वातवरणाचा केमिकल लोचा
मुंबईतल्या साकीनाक्यामध्ये पाण्यातून मोठा कचरा वाहून गेला आहे. तर पुण्यातील कात्रजमध्ये वढा पाऊस पडला की रस्त्यावर पार्क केलेली वाहनं वाहून गेली ही अशी दृश्यं आपल्याला साधारणपणे जुलै, ऑगस्टमध्ये दिसतात... यंदा मात्र अजून मान्सून दाखलही झालेला नाही तोच रस्त्यांच्या अशा नद्या झाल्या आहेत. सध्या सकाळी ऊन पडतंय.... दुपारी प्रचंड उकडतंय आणि रात्री विजा चमकून, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय...थोडक्यात काय तर वातावरणाचा फुल्ल केमिकल लोचा झालाय.
हाच नेमका केमिकल लोचा काय झालाय आणि मे महिन्यातच एवढा पाऊस का पडतोय? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे समजून घेण्यापूर्वी पुढचे दोन दिवस तुमच्या शहरात, जिल्ह्यात पाऊस परिस्थिती कशी असेल....
- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय...
- तर राज्यातल्या 15 ठिकाणी पुढचे तीन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय
- पुणे आणि परिसरातल्या घाटमाथ्यावर 23 आणि 24 मे ला अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे
- कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर 23 ते 25 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय
- उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत 23 मे ला जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे
- तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 23, 24 आणि 25 मे हे तीन दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे
- रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 23, 24, 25 मेला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय
- सध्या रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट देण्यात आलाय
- पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट
- तर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय
- अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट आहे
- राज्यात विदर्भासह उर्वरित भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा आहे, या भागाला यलो अलर्ट दिला गेलाय...
पावसाळा सुरू झाला की अशा या रेड अलर्ट, ऑरेंग्ज अलर्ट, यलो अलर्टच्या बातम्या सुरू होतात. यंदा मात्र असे अलर्ट मे महिन्यातच देण्याची वेळ आली आहे. हे अलर्ट प्रशासनासाठी, त्या त्या जिल्ह्यातल्या महापालिकांसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तर असतातच....मात्र पावसाच्या या अलर्टच्या रंगांनुसार तुम्हीसुद्धा म्हणजे नागरिकांनीसुद्धा काय खबरदारी घ्यायची, हे ठरवायचं असतं... म्हणूनच आम्ही तुम्हाला पावसाच्या अलर्टच्या या रंगांचे अर्थ सांगणार आहोत...
( नक्की वाचा : Rain Alert: मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट )
रेड अलर्ट म्हणजे काय?
रेड अलर्ट हा लाल रंगाचा... लाल हा धोक्याचा रंग.... म्हणूनच रेड अलर्ट म्हणजे पावसाचा सर्वोच्च अलर्ट. हा अलर्ट दिल्यावर 204 मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो... म्हणजेच अतिमुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी होऊ शकते, पूर येऊ शकतो, भूस्खलन होऊ शकतं किंवा ढगफुटीसुद्धा होऊ शकते. रेड अलर्ट दिल्यावर प्रशासनानं काय करायचं असतं, तर नैसर्गिक आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी तयार राहायचं असतं. नदीजवळ, नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवायचं असत आणि रेड अलर्ट दिल्यावर नागरिकांनी काय करायचं तर... पावसाचा रेड अलर्ट दिलेला असताना नागरिकांनी घराबाहेर पडायचं नाही, धोकादायक भागांमध्ये जायचं नाही.
ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
आता पावसाच्या पुढच्या अलर्टचा रंग म्हणजे ऑरेंज अलर्ट....ऑरेंज अलर्ट दिल्यावर ११५ मिलिमीटर ते २०४ मिलिमीटर पावसाची शक्यता असते तेव्हा ऑरेंज अलर्ट दिला जातो... म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता असते, एखादी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. अशा वेळी प्रशासनानं काय करावं तर ऑरेंज अलर्टमध्ये वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते, त्या दृष्टीनं आधीच उपाययोजना करायच्या असतात तर, नागरिकांनी ऑरेंज अलर्टमध्ये गरज असेल तरच घराबाहेर पडायचं असतं.
( नक्की वाचा : Pune Rain Update : पुण्यात प्रशासनाचे सर्व दावे फोल; पहिल्या मोठ्या पावसाने नागरिकांना दाणादाण )
यलो अलर्ट म्हणजे काय?
ऑरेंजनंतर येतो यल्लो अलर्ट...64 मिलिमीटर ते 115 मिलिमीटर एवढा जोरदार पाऊस पडणार असेल तर यलो अलर्ट दिला जातो. यलो अलर्ट असला तरी प्रशासनाला नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश असतात तर नागरिकांनी यल्लो अलर्ट असताना सावधगिरी बाळगायची असते.
ग्रीन अलर्ट
शेवटचा असतो तो ग्रीन अलर्ट... ग्रीन अलर्टमध्ये 15 मिलिमीटर ते 64 मिलीमीटर एवढाच पाऊस पडतो. या परिस्थितीमध्ये पाऊस अत्यंत सामान्य असतो. यावेळी प्रशासनानं कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते. तर, पावसाच्या ग्रीन अलर्टमध्ये नागरिक प्रवास करू शकतात, नियमित व्यवहार करू शकतात
मे महिन्यात एवढा पाऊस का?
आता आपण येऊया आपल्या मुख्य विषयाकडे.... तो म्हणजे मे महिन्यातच एवढा पाऊस का पडतोय. दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात तर मे महिन्यात ढगफुटीसारखा पाऊस झालाय....
तर इकडे मुंबईमधल्या पावसाची नोंद तब्बल 85 मिलीमीटर्यंत गेलीय. मुंबईमध्ये 1951 नंतर पहिल्यांदाच म्हणजे गेल्या 75 वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यातलं तापमान 22 अंश इतकं कमी नोंदवलं गेलंय...
आता मे महिन्यात एवढा धो धो पाऊस का झाला, याचं पहिलं कारण म्हणजे....
- अरबी समुद्रातलं कमी दाबाचं क्षेत्र
- अरबी समुद्रात ज्या ज्या वेळी कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं, त्या त्या वेळी पावसाचं प्रमाण वाढतं
- कारण या प्रक्रियेदरम्यान हवा समुद्राच्या पृष्ठभागावर जाते आणि तिथला ओलावा शोषून घेते
- या बाष्पयुक्त हवेला ढग वरती उचलून नेतात आणि पाऊस पडतो...
समुद्राच्या पाण्याची उष्णतेनं वाफ होते... ती वाफ वर जाते... आणि मग ढगांमधून पाऊस पडतो...हे अगदी आपण शाळेत शिकलेलं विज्ञान आहे.... मात्र ज्यावेळी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यावेळी हवेचं प्रमाण वाढतं. परिणामी बाष्पाचं प्रमाणही वाढतं आणि जास्त पाऊस येतो
मे महिन्यात पाऊस होण्याचं दुसरं कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस...वेस्टर्न डिस्टर्बन्सेसला मराठीतला शब्द शोधायचाच झाला तर पश्चिमी विकोप असं म्हणतात. थोडक्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे भूमध्यसागरातले वारे. सध्या हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तीव्र झाले आहेत.
या वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता आहे. बऱ्याच वेळा हे वारे उत्तर भारत किंवा मध्य भारतापर्यंत वाहतात. यंदा मात्र हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेत. जेव्हा हे थंड वारे भारतातल्या उत्तर भागात येतात तेव्हा ते तिथल्या उष्ण हवेला वर ढकलतात. एकदा का उष्ण हवा ठराविक उंचीच्या वर गेली की ती उष्ण हवासुद्धा आपोआप थंड होऊ लागते... या हवेमध्ये ओलावा म्हणजेच बाष्प तयार होतं.... आणि पाऊस पडतो
सध्या पडणाऱ्या धो धो पावसाचं पुढचं कारण पाहुया...आपल्याला माहीतेय की समुद्रातल्या पाण्याचा, आणि त्या पाण्याच्या तापमानाचा पावसावर मोठा परिणाम होत असतो. इंडियन ओशन म्हणजे हिंद महासागर, पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर आणि अरेबियन सी अर्थात अरबी समुद्र या तिघांच्याही पाण्याचं तापमान यंदा पाऊस कसा पडेल, ते ठरवतं.
यंदा काय झालंय, अरबी समुद्रातलं पाणी विविध कारणांमुळे जास्त उष्ण झाले आहे.त्यामुळे अरबी समुद्रात जास्त बाष्प तयार झालंय. त्यातच भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हे बाष्प महाराष्ट्राकडे ढकललं जातंय. त्यामुळे यंदा मे महिन्यातच जोरदार पाऊस पडतोय.
- अल निनो परिस्थिती तयार झाली की कमी पाऊस
- आणि ला निनाची परिस्थिती तयार झाली की मोठ्या प्रमाणात पाऊस हे ठरलेलं आहे...
- गेल्या काही महिन्यांपासून ला निना म्हणजे जास्त पाऊस पडण्यासाठीचा हा घटक सक्रिय झालाय...
- जेव्हा ला निना सक्रिय होतो, त्यावेळी वेळेआधीही जास्त पाऊस पडू शकतो...
- आणि एरवी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत माघारी फिरणारा पाऊस ला निना सक्रिय असेल तर अगदी नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम वाढवू शकतो...
- आणि आता मे महिन्यातल्या पावसाचं चिंता करायला लावणारं पुढचं कारण... ते म्हणजे हवामान बदल....
- हवामान बदलामुळे निसर्गात अशा काही गोष्टी घडतायत, की त्याचा अंदाज लावणंही कठीण आहे...
जगभरातच प्रदूषण वाढलंय, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. या सगळ्यामुळे पृथ्वीवरचं सरासरी तापमान वाढतंय, आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल म्हणावे तितके जागरुक नाहीया हवामान बदलामुळे कधी कुठे ढगफुटी होतेय, तर कधी कुठे गारा पडतायत... एकंदरीतच पर्यावरणाचा समतोल बिघडलाय... त्यामुळेच पाऊस नियम मोडून वागतोय... कधीही, कुठेही आणि कसाही पडतोय...
आता काल परवा मुंबई, पुण्यात जो पाऊस पडला, त्याचा पॅटर्न पाहाता दोन-तीन तासांत प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय...तुम्ही गेल्या काही वर्षांतला शहरातल्या पावसाचा ट्रेंड पाहिला असेल तर फक्त काही तासांसाठी पाऊस पडतो, पण तो प्रचंड प्रमाणात पडतआणि शहरांची पार वाट लावून जातो...
तेच हे पुढचं कारण.... त्याला म्हणतात अर्बन हीट आयलंड इफेक्ट अर्थात UHI....यामध्ये काय होतं की शहरांमध्ये झालेल्य मोठ्या प्रमाणातल्या काँक्रिटीकरणामुळे उष्णता वाढते. शहरांत मोठमोठ्या इमारतीही काचेच्या असतात, काचासुद्धा उष्णता वाढवतात. उष्णता वाढल्यामुळे पाऊस जास्त पडतो.... आणि काँक्रिटचे रस्ते पावसाचं पाणी शोषून घेऊ शकत नाहीत, त्यामुळे पावासाच्या पाण्याचा निचराही होत नाही.
तर, मे महिन्यात पाऊस का पडतोय, याची ही सगळी कारणं होती. आता पुढचे तीन दिवस पाऊस पडतच राहणार आहे. मे महिन्यातला हा पाऊस संपतो न संपतो तोच त्याला खो देत मान्सून यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात पोहोचणार आहे. त्यामुळे या वीकेंडला पावसाची तयारी करून ठेवा... छत्र्या शोधून ठेवा, छत्र्यांच्या तारा तुटल्या असतील तर दुरुस्तीला टाका. पावसाचं चक्रं बदलणं, त्याचं वेळापत्रक बदलणं ही काही चांगली गोष्ट नाही.... त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढं निसर्गासाठी नक्की करा...
पावसाळ्याआधी एक तरी झाड लावा....
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world