रिजवान शेख, ठाणे
Thane News: ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेल्या मयूर शिंदे याचा भाजपमध्ये होणारा प्रवेश ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. अधिकृतपणे आचारसंहिता लागू असल्यामुळे पक्ष प्रवेश पुढे ढकलल्याचे कारण देण्यात आले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामागे राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत फोन?
ठाणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. वागळे इस्टेट परिसरात प्रभाव असलेल्या मयूर शिंदे याचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाचे वर्चस्व कमी होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, याच कारणामुळे एकनाथ शिंदे यांनी या प्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि थेट दिल्लीतील भाजप हायकमांडशी संपर्क साधला. दिल्ली दरबाराकडून भाजपच्या राज्य नेतृत्वाला याबाबत सूचना देण्यात आल्या, ज्यामुळे मयूर शिंदे याच्या प्रवेशावर ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
(नक्की वाचा- VIDEO: नवले पुलावर वसंत मोरे थोडक्यात बचावले! फेसबुक लाईव्ह दरम्यानचा व्हिडीओ आला समोर)
पक्षप्रवेशाची तयारी
मयूर शिंदे याचा पक्षप्रवेश 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता आरजे ठाकूर कॉलेज पटांगणात होणार होता. यासाठी ठाण्यात सर्वत्र बॅनरबाजी देखील करण्यात आली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह ठाण्यातील भाजपचे अनेक प्रमुख नेते या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार होते.
(नक्की वाचा- Pune News: पाठलाग, शिवीगाळ अन् कारची तोडफोड; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जोडप्यासोबत भयंकर घडलं; कारण...)
मयुर शिंदेची गुन्हेगारी पार्श्वभूमी
मयूर शिंदे याच्याविरोधात हत्या, खंडणी यांसारखे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत हा पक्षप्रवेश होत असल्याने समाजमाध्यमांवरून मोठी टीका देखील होत होती.
(नक्की वाचा- VIDEO Viral: मेस्सी फॅन्सची 'हटके स्टाईल'! एका सुरात घोषणाबाजी, मुंबई पोलिसांच्या चेहऱ्यावरही फुललं हसू)
वागळे इस्टेट परिसरात प्रभाव
मयूर शिंदे याचा वागळे परिसरामध्ये मोठा प्रभाव आहे. 2017 मध्ये नगरसेवक निवडून आणण्यात आणि तीन जागा मिळवून देण्यात त्याची मोलाची भूमिका होती. याच कारणामुळे त्याचे पक्षांतर ठाण्याच्या राजकारणासाठी महत्त्वपूर्ण मानले जात होते, ज्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपामुळे हा प्रवेश तात्काळ थांबवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.