राहुल कांबळे, नवी मुंबई
नवी मुंबईतील पाम बीच रोडवर पुन्हा एकदा अतिवेगाच्या थरारात जीवघेणा अपघात घडला आहे. चाणक्य सिग्नलजवळ रविवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास एका महागड्या स्पोर्ट्स कारचा भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाशीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, Mercedes स्पोर्ट्स कार वाशीच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने चार ते पाच वेळा पलटी घेतली आणि मधल्या लोखंडी बॅरिकेड्स तोडत बेलापूरच्या लेनमध्ये आदळली. या अपघातामुळे कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
(नक्की वाचा- New Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुडन्यूज! पुण्यातून लवकरच 4 नव्या 'वंदे भारत एक्सप्रेस' धावणार)
नवी मुंबई पाम बीच रोडवरील वेगमर्यादा प्रतितास 60 किमी आहे. मात्र तरीही अनेक वाहनचालक या मार्गावर स्पीडचा थरार अनुभवण्याच्या नादात आपले आणि इतरांचे प्राण धोक्यात टाकत आहेत. यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
(नक्की वाचा- Vande Bharat Train: मुंबई-पुणे-सोलापूर 'वंदे भारत' एक्स्प्रेस डब्यांची संख्या वाढली; प्रवाशांना मोठा दिलासा)
घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून अपघाताचे नेमके कारण व कारमध्ये आणखी कोणी होते का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर पाम बीच रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. Mercedes कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.