जाहिरात

Akola News: अकोल्यातील प्रवाशांची चिंता वाढवणारी बातमी, मार्केटमधील स्थिती पाहून अनेकांना बसलाय धक्का

आखाती देशात अर्थातच मध्य-पूर्व भागात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता देशातील इंधन बाजारावरही दिसू लागला असून त्याचे पडसाद अकोला शहरातही उमटताना दिसत आहेत.

Akola News: अकोल्यातील प्रवाशांची चिंता वाढवणारी बातमी, मार्केटमधील स्थिती पाहून अनेकांना बसलाय धक्का
Akola Rikshaw Driver News Today

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News Today : आखाती देशात अर्थातच मध्य-पूर्व भागात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता देशातील इंधन बाजारावरही दिसू लागला असून त्याचे पडसाद अकोला शहरातही उमटताना दिसत आहेत.एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर थेट परिणाम झाल्याने शहरातील अनेक गॅस पंपांवर सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विशेषतः ऑटो रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस भरण्यासाठी शहरातील विविध पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत असून काही ठिकाणी ही परिस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे.

अकोल्यात गॅससाठी ऑटो रिक्षांच्या लांब रांगा

अकोला शहरातील एलपीजी गॅस पंपांवर सध्या गॅसचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्यामुळे ऑटो रिक्षा चालकांची मोठी गैरसोय होत आहे.अनेक चालक सकाळपासूनच सिव्हिल लाईन रोडवरील पेट्रोल पंप वर आपल्या वाहनांसह गॅस पंपांवर रांगेत उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे.काही ठिकाणी या रांगा दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाढल्याचेही दिसून येत आहे.भर उन्हात चालकांना तासंतास रांगेत थांबावे लागत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या परिस्थितीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

चालकांच्या कमाईवर परिणाम, उपाययोजनांची मागणी

या दरम्यान, गॅस वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक ऑटो चालकांचा दिवसभराचा व्यवसाय ठप्प होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.रोजंदारीवर अवलंबून असलेल्या चालकांना या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. भर उन्हात  रांगेत उभे राहूनही गॅस मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता असल्याने चालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.दरम्यान, युद्ध परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात असले तरी स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात,तसेच गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता ऑटो चालकांकडून करण्यात येत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com