मनोज सातवी, प्रतिनिधी
ठाण्यातील (Thane News) मिलिंद मोरे (47) आपल्या कुटुंबासह रविवारी विरारच्या नवापूर येथील सेव्हन सी बीच रिसॉर्ट येथे सहलीसाठी आले होते. संध्याकाळी रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना एका रिक्षाचालकाने मोरे यांच्या पुतण्याला धडक दिली. त्यानंतर मोरे कुटुंबीय आणि रिक्षा चालकामध्ये वाद झाला. त्यानंतर काही वेळातच रिक्षा चालक आपल्या साथीदारांना घेऊन आला आणि त्याने मिलिंद मोरे , त्यांचा भाऊ आणि दोन मित्रांवर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी मिलिंद मोरे यांना जबर मारहाण करण्यात आली. यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना विरार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मिलिंद मोरे ठाण्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र. ते ठाण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी होते. मोरे कुटुंबीय अर्नाळा येथील एका रिसॉर्टमध्ये सुट्टी निमित्त सहलीसाठी आले होते. त्यावेळी जमावाच्या हल्ल्यात त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यात त्यांचा मृत्यू झाला.
नक्की वाचा - स्वत:च्या हत्येचा कागदावर आखला प्लान; ब्ल्यू व्हेल गेमच्या नादात पुण्यातील मुलासोबत भयंकर घडलं...
मिलिंद मोरे यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते कोसळतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी रिक्षा चालकासह दहा ते बारा जणांविरोधात कलम 304 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.
कलम 304 IPC, भाग II (भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (2) नुसार कोणीही एखाद्या कृत्यासाठी दोषी आढळल्यास ज्याचा परिणाम मृत्यू होतो, एखादी कृती जी मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने केली जाते किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते अशा शारीरिक दुखापतीस दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकते.