मित्रांची मस्ती जीवावर बेतली; नवी मुंबईत अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू 

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पाच मित्र तुर्भे एमआयडीसीतील दगडांच्या खाणीतील तलावात पोहायला गेले होते. तिथे पोहत असताना मस्तीमध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा पाय पाण्यामध्ये खेचला.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुस्कान मकानदार, नवी मुंबई

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी विभागात असलेल्या दगडाच्या खाणीतील पाण्यात पोहायला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्यात मित्रांनी केलेल्या मस्तीमुळे या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी दोन मित्रांना ताब्यत घेत गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच मित्र तुर्भे एमआयडीसीतील दगडांच्या खाणीतील तलावात पोहायला गेले होते. तिथे पोहत असताना मस्तीमध्ये मित्रांनी दुसऱ्या मित्राचा पाय पाण्यामध्ये खेचला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या चारही जणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. 

(नक्की वाचा- पत्रक, स्कॅनर, बायबल अन् पाच महिला; पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?) 

त्यानंतर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने एका मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी सदर व्यक्ती कोण आहे याचा शोध सुरु केला. त्यावेळी मृत मुलाच्या कुटुंबियांपर्यंत पोलीस पोहोचले. मात्र मुलाचा मृत्यू नेमका कसा झाला, याचाही पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी सर्वात आधी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. 

(नक्की वाचा- सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, Youtube व्हिडीओ आला समोर)

सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना दिसून आले की, मृत मुलगा आपल्या चार मित्रासह येथे आला होता. मात्र काही वेळाने हे मित्र येथून निघून जातानाही सीसीटीव्हीमध्ये दिसले. पोलिसांनी चारही मित्रांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी केली. त्यावेळी मजामस्ती करताना या मुलाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. चारपैकी दोन मुलांनी आपला गुन्हा कबूल केला असून दोघांचीही पोलिसांनी भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article