Mira Bhayander: मुंबईजवळील मीरा भाईंदर परिसरातून एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे शारीरिक आणि मानसिक शोषण करून तिची ऑनलाइन 'लिलाव' करण्याचा प्रयत्न झाल्याच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपी अद्याप मोकळाच आहे.
मैत्रीचा फायदा आणि सहा महिने छळ
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, शेजारी राहणाऱ्या जावेद नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेऊन जावेदने पीडितेचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ गुपचूप काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ब्लॅकमेलिंगच्या जोरावर आरोपीने तिला मध्य प्रदेशात नेले. तिथे एका खोलीत डांबून ठेवून सुमारे सहा महिने तिच्यावर सतत अत्याचार करण्यात आले.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
सायबर गुन्हेगारीचा भयानक चेहरा
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पीडितेच्या नावाने इंस्टाग्रामवर एक बनावट खाते उघडले. या खात्यावर तिचे फोटो पोस्ट करून आरोपीने चक्क 'रेट कार्ड' जारी केले. पीडितेची ऑनलाइन बोली लावून तिची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे अल्पवयीन मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सक्तीचे धर्मांतर आणि कौटुंबिक संकट
पीडितेने आरोप केला आहे की, आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकला आणि तिच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य केले. पीडितेच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असल्याने ती आधीच मानसिक धक्क्यात होती, ज्याचा फायदा आरोपीने घेतला.
(नक्की वाचा- Navi Mumbai Crime: टीप मिळताच सापळा! पोलीस बनले ग्राहक, लॉजवर पोहोचले अन् जे पाहिलं... नवी मुंबईत खळबळ)
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वालिव पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल होऊनही आरोपी जावेद अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपी उघडपणे धमक्या देत असल्यामुळे पीडिता आणि तिचे कुटुंब प्रचंड दहशतीत आहे. न्यायासाठी आणि सुरक्षेसाठी पीडितेने आता महाराष्ट्राचे *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world