मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई मेट्रो मार्ग 7अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2) वरील डाऊनलाईन टनलचे ब्रेकथ्रू पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1 सप्टेंबर 2023 रोजी पहिले TBM (टनेल बोअरिंग मशिन) जमिनीपासून 30 मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आले. मेट्रो मार्ग 3 च्या वरुन सहार उन्नत रस्त्यांखालून, मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्यांना क्रॉस करुन TBM ने बोगद्याचे ब्रेकथ्रू आज यशस्वीरित्या पूर्ण केले. TBM ब्रेकथ्रूचा हा संपूर्ण कार्यक्रम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवला.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्टेशन ते एअरपोर्ट कॉलनी स्टेशनदरम्यान हा 1.65 किलोमीटरचा बोगदा असणार आहे. ही मेट्रो जोडणी मुंबई महानगर प्रदेशातील एकूण मेट्रो जाळ्यासाठी महत्त्वाचा टप्पा असणार आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा-भाईंदर व पुढे वसई-विरार हे भाग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत मेट्रोने जोडले जातील. सद्यस्थितीत या मेट्रो मार्गाचे 59% काम पूर्ण झाले आहे.
( नक्की वाचा : आपले सरकार पोर्टलवर सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई केल्यास दरदिवशी 1 हजाराचा दंड )
या मेट्रो मार्गाची लांबी 3.4 किलोमीटर असून त्यापैकी उन्नत मार्ग 0.94 किलोमीटर आणि भूमिगत 2.50 किलोमीटर आहे. या मार्गावर 2 स्थानके असणार आहेत. उन्नत मार्गावर एअरपोर्ट कॉलनी हे पहिले स्थानक तर दुसरे भूमिगत स्थानक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असणार आहे. उन्नत मेट्रो मार्ग 0.57 किलोमीटर असेल तर दुहेरी बोगद्याची लांबी 2.035 किलोमीटर आहे.
काय आहेत प्रकल्पाचे फायदे?
- मेट्रो मार्ग 7अ मुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो मार्ग थेट विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले जातील.
- मेट्रो मार्ग 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या भूमिगत स्थानक व मार्गासोबत सुलभ संलग्नीकरण होईल
- प्रवाशांसाठी सुरक्षित, आरामदायी व सुलभ प्रवास
- बहुपध्दती वाहतूक साधनांचे उत्कृष्ट एकत्रीकरण (Multi Modal Integration)
- दाटीवाटीच्या नागरी परिसरातून मेट्रोसाठी उन्नत व भूमिगत मार्गाची रचना केल्यामुळे विमानतळ परिसरात मेट्रो बांधकामासाठी कमी जागा व्यापते