Raju Patil On KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेचा एक निर्णय सध्या चांगलाच चर्चेत आहेत. महापालिकेनं त्यांच्या हद्दीतील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने 24 तास बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. . 14 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत प्राण्यांची कत्तल करु नये असे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्याचबरोबर या कालावधीत मांस विक्री करु नये असा आदेशही महापालिकेनं दिलाय. या निर्णयावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलंय.
मनसे नेते राजू पाटील यांनी या विषयावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'काहीतरी निमित्त काढून जर कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त त्या दिवशी मटण व मच्छी विक्री वर बंदी आणण्याचा फतवा काढत असतील तर त्याला विरोध तर होणारच.१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स, KFC , mcdonald's सारखे उपाहारगृह बंद ठेवणार आहात का?', असा प्रश्न पाटील यांनी ट्विट करत विचारला आहे.
'उगीचच चांगल्या दिवशी आमच्या व प्रशासनाच्या डोक्याला ताप देऊ नये.माझी ठाणे पोलिस आयुक्तांना पण विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा', असं आवाहन त्यांनी केलं आहे. राजू पाटील यांनी या ट्वि्टमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका तसंच ठाणे शहर पोलिसांना टॅग केलं आहे.
( नक्की वाचा : Dombivli : 'ह्यांना ना जनाची, ना मनाची!' डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीवर मनसेचे नेते राजू पाटील काय म्हणाले? )
राजू पाटील काय म्हणाले?
राजू पाटील यांनी या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, १५ ऑगस्ट, देशाचा स्वातंत्र्य दिवस व त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती पण आहे, त्यात श्रावण ! अर्थातच बहुसंख्य लोक त्यादिवशी शाकाहार करणे पसंत करतील. परंतु काहीतरी निमित्त काढून जर कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त त्या दिवशी मटण व मच्छी विक्री वर बंदी आणण्याचा फतवा काढत असतील तर त्याला विरोध तर होणारच.
१५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स, KFC , mcdonald's सारखे उपाहारगृह बंद ठेवणार आहात का ? कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राला लागूनच असलेला ठाणे,उल्हासनगर,नवीमुंबई महानगरपालिका व जि.प. क्षेत्रात असा कुठलाच फतवा काढला नसताना आमच्या आयुक्तांना ही उपरती का झाली हे अनाकलनीय आहे. आमचा या फतव्याला विरोध आहे.ज्यांना जे खायचे ते खावे, कोणी काय खावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.
आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा, उगीचच चांगल्या दिवशी आमच्या व प्रशासनाच्या डोक्याला ताप देऊ नये.माझी ठाणे पोलिस आयुक्तांना पण विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा.