मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सोशल मीडियावर अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या व्यक्तीस मनसैनिकांनी चोप दिला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव इथं ही घटना घडली. ज्याने ही कमेंट केली होती त्याला मनसैनिकांनी गाठत चांगलाच धडा शिकवला आहे. त्याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच उद्धव आणि राज ठाकरे यांचा विजय मेळावा मुंबईत झाला. दोघे बंधू एकत्र येणार असल्याने सध्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. शिवाय मराठी वरून मसने आणि शिवसेना आक्रमक झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत नुकताच शिवसेना-मनसेचा विजयी मेळावा पार पडला. त्यानंतर आंबेगावमध्ये राहणाऱ्या एका अमराठी व्यक्तीने सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्याविरोधात शिवराळ भाषेत टिप्पणी केली होती. या घटनेची माहिती स्थानिक मनसैनिकांना मिळाली. त्यांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्याचा पत्ता मनसैनिकांच्या हाती लागला. त्यानंतर हे सर्व मनसैनिक त्याच्या राहत्या घरी धडकले. त्यावेळी तो तिथेच होता. तावडीत सापडलेल्या या वक्तीला त्यांनी मग चांगलाच चोप दिला.
ज्या वेळी मनसैनिक या वक्तीला चोप देत होते त्यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस तातडीने या ठिकाणी पोहोचले. त्यांनी यात हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी मनसैनिकांनी चोप दिल्यानंतर त्या व्यक्तीने माफी मागितली आहे. शिवाय अशा प्रकारची कृती करणार नाही, असे त्याच्याकडून लिहून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनसेने राज ठाकरे यांच्यावरील व्यक्तिगत हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशारा यानिमित्ताने पुन्हा दिला आहे.