Monsoon 2026 Updates: राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो मान्सून अखेर दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या सुरुवातीच्या दिलासादायक बातमीसोबतच चिंतेची बाब म्हणजे 9 जूननंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत संपूर्ण राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता, पण पेरणीसाठी अपुरा | Thunderstorms Expected In Vidarbha And Marathwada, But Insufficient For Sowing
सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर हवामानात बदल पाहायला मिळतील. या भागात अंशतः ढगाळ वातावरण राहून विखुरलेल्या स्वरूपाचा, मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस केवळ काही भागांपुरता मर्यादित आणि विखुरलेला असल्याने, व्यापक क्षेत्रावर पेरणी करण्यासाठी तो पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ या वादळी पावसावर विसंबून राहू नये.
12 जूनपर्यंत उन्हाचा चटका कायम; विदर्भात तापमान 40 अंशांच्या पार| Heatwave Conditions To Continue Till June 12; Temperature Over 40°C In Vidarbha
मान्सून दाखल झाला असला तरी राज्यातील उष्णतेची लाट आणि उन्हाचा चटका तूर्तास कमी होणार नाही. किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च पातळीवर राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ आणि खानदेशात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले जाऊ शकते. तर दुसरीकडे मराठवाड्यातही नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार असून तेथील तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून महत्त्वपूर्ण आवाहन | Crucial Advisory From Agriculture And Disaster Management Department
हवामानाची ही बदलती आणि अनिश्चित स्थिती पाहता कृषी विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना आणि आवाहन जारी करण्यात आले आहे:
- आगामी काळात होणारा पाऊस हा मान्सूनचा सर्वदूर पाऊस नसून स्थानिक पातळीवरील वादळी पाऊस आहे. त्यामुळे या पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणीची घाईघाईने पेरणी करू नये. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याचा धोका संभवतो.
- दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडत असताना विजा कोसळण्याचा धोका असतो. अशा वेळी नागरिकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी कोणत्याही झाडाचा किंवा टिनशेडचा (पत्र्याच्या शेडचा) आसरा घेणे पूर्णपणे टाळावे.
- वादळी पावसादरम्यान विद्युत ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब आणि उघड्या विद्युत वाहिन्यांच्या (लाईटच्या तारा) जवळ उभे राहू नये, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील.
कर्नाटकात तीन दिवस रेड अलर्ट जारी | karnataka Rain Red Alert News
महाराष्ट्रातील जनता पावसाच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे कर्नाटकात नैऋत्य मान्सूनमुळे पाऊस तीव्र झाला आहे. भारत हवामानशास्त्र विभागाने (IMD) किनारपट्टीवरील दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यांसाठी सोमवारसाठी(8 जून) 'रेड अलर्ट' जारी केला आहे. हवामान विभागाच्या येथील केंद्रानुसार, मंगळवारी (9 जून) दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड, चिक्कमगलुरु आणि शिवमोग्गा या पाच जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' लागू राहील.
आयएमडीने (IMD) सांगितले की, बुधवारी उडुपी, उत्तर कन्नड, चिक्कमगलुरु, शिवमोग्गा, बेळगावी, धारवाड आणि हावेरी या सात जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने निवेदनात म्हटले आहे की, संबंधित जिल्ह्यांसाठी दिलेला हा इशारा ठराविक दिवशी सकाळी 8.30 वाजेपासून पुढील 24 तासांसाठी लागू असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world