- जून महिन्याच्या शेवटपर्यंत राज्यात पाऊस झालेला नाही. ही चिंतेची बाब आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून ला कोकणात धो धो पाऊस होईल असं सांगितलं आहे
- आयएमडीच्या अंदाजानुसार कोकणात जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पाऊस सुरू होईल
जून महिना संपत आला तरी पावसाचा अजून पत्ता नाही. शेतकऱ्याच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. पाऊस होत नसल्यामुळे पेरणी ही लांबली आहे. त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊस कधी आणि कुठे पडणार आहे याची माहिती दिली आहे. अल निनोमुळे हा पाऊस लांबला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पाऊस नसल्यामुळे राज्या समोर मोठं संकट उभं राहू शकतं अशी भिती ही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पावसाबाबतची माहिती दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते.
फडणवीस यांनी सांगितले की राज्यात सध्या अडचणीची स्थिती आहे. अलनिनो मुळे पाऊस लांबला आहे. दर वर्षी जून महिन्याच्या पावसाचा विचार केला तर सरासरी पेक्षा 80 टक्के पाऊस कमी पडला आहे. तर कोकणात तब्बल 86 टक्के कमी पाऊस पडला आहे. ही चिंतेची बाब आहे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. काही जिल्ह्यात पावसाचा एक थेंब ही पडला नाही असं ही ते म्हणाले. मात्र हवामान विभागानं आता आपला अंदाज व्यक्त केला आहे. त्यात कधी पाऊस येणार आहे याची माहिती दिली आहे.
आयएमडीने जी माहिती दिली आहे त्यानुसार कोकणात 23 जूनपासून पावसाचा जोर धरेल. कोकणात या काळात धोधो पाऊस होण्याचा आंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्याच वेळी विदर्भ -मराठवाड्यात कमी किंवा मध्यम पाऊस असेल. त्यामुळे हा आंदाज पाहाता जुलैच्या सुरूवाती पर्यंत पेरणी सारखा पाऊस नसेल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू असे आवाहन केले आहे. सरकार पेरणी बाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी सुचना करेल असं ही फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान पाऊस नसल्यामुळे पाणी साठा देखील मर्यादीत आहे. सध्या राज्यात सरासरी 24 टक्केच पाणी साठा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितले. तो आधी 33 टक्के पर्यंत असायचा. ही स्थिती पाहाता शेतकऱ्यांना पाणी उपस्यावर बंदी घातली आहे. पाऊस जो पर्यंत येत नाही तो पर्यंत पिण्याचे पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. पाऊस लांबला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट येईल. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पत्करून उपसा बंद केला आहे असं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. बियाण्याची स्थिती चांगलं आहे असं ही ते म्हणाले.