मेहबूब जमादार, प्रतिनिधी
Khopoli Zenith Waterfall News : पावसाळी पर्यटनासाठी शेकडो लोक खोपोलीतील प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर गर्दी करतात. मागील तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने जोरदार पाऊस पडला. त्यामुळे वीकएंडला एन्जॉय करण्यासाठी काही पर्यटकांनी झेनिथ धबधब्याची वाट धरली. या धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मात्र मोठं संकट उभं ठाकलं होतं. पर्यटक धबधब्याच्या डोहात आनंद लुटून घरी परतत होते. त्याचदरम्यान धबधब्याच्या प्रवाहातून निघणारे पाणी दुथडी भरून वाहत असल्याने पर्यटकांना ओढा पार करण्यात अडथळा आला. परिणामी शंभरहून अधिक पर्यटक या पुराच्या पाण्यात अडकले.त्यानंतर पर्यटकांमध्ये एकच घबराट उडाली.
2-3 तास रेस्क्यू ऑपेरेशन सुरु होतं
या घटनेची माहिती मिळताच,परिसरातील विहारी ठाकुरवाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर दोरखंडाच्या साहाय्याने मानव साखळी करून पर्यटकांना नदी पार करून सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.जवळपास 2-3 तास हे रेस्क्यू ऑपेरेशन सुरु होते.