रेवती हिंगवे, पुणे
MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSC परीक्षांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात काही ठिकाणी आलेल्या पूर परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही मागणी फेटाळत, एमपीएससीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी 'महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2025' ही नियोजित वेळापत्रकानुसार रविवार, दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजीच पार पडणार आहे. राज्यातील पूर परिस्थिती आणि काही भागातील जोरदार पाऊस लक्षात घेता काही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, एमपीएससीने परीक्षा नियोजनाचे तपशील जाहीर केल्याने, ही परीक्षा वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 385 पदांच्या भरतीसाठी ही पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर जवळपास 3 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
- परीक्षा कधी: रविवार, दिनांक 28 सप्टेंबर 2025
- किती पदे: एकूण 385 पदे (35 पैकी 9 संवर्गातील)
- किती विद्यार्थी: अंदाजे 3 लाख विद्यार्थी
MPSC Letter
एमपीएससीने यासंदर्भात एक परिपत्रक काढून परीक्षा नियोजनाचे तपशील आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सध्या तरी परीक्षा पुढे ढकलण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी कायम
राज्याच्या काही भागांमध्ये पडत असलेला जोरदार पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचू शकणार नाहीत, तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही याचा परिणाम होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली आहे.
मात्र, आयोगाने वेळापत्रकावर ठाम राहून सूचना जाहीर केल्यामुळे, प्रशासकीय पातळीवर परीक्षा वेळेवर घेण्याची पूर्ण तयारी झाली आहे. सर्व उमेदवारांनी परीक्षेसाठी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.