Pune News: 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern) या सुपरहिट चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या 'पिट्या भाई'ची भूमिका साकारणारे अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) 'जय महाराष्ट्र' केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीत परदेशी यांना फटकारल्यानंतर त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. रमेश परदेशी यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे हे स्पष्ट केले असून, यापुढे ते 'राष्ट्र प्रथम' (Rashtra Pratham) या विचारांसोबत म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान ही पोस्ट केल्यानंतर थोड्याच वेळात परदेशी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
राज ठाकरेंच्या फटकारानंतर निर्णय
रमेश परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. आगामी निवडणुका आणि पक्षबांधणीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याच बैठकीत राज ठाकरे यांनी 'पिट्या भाई' फेम रमेश परदेशी यांना थेट फटकारले.
राज ठाकरे यांनी परदेशी यांना प्रश्न विचारला की, "तू छातीठोकपणे सांगतोस, संघाचा कार्यकर्ता आहेस, तर कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा." एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विचारधारेसोबत न राहण्याचा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला. मनसे चित्रपट सेनेच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याला राज ठाकरेंनी थेट सुनावल्यामुळे बैठकीत काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
( नक्की वाचा : Leopard attack: 'त्या' बिबट्यांची नसबंदी करणार! ड्रोनने शोधून पकडणार; वाचा राज्य सरकारचे ऐतिहासिक निर्णय )
'राष्ट्र प्रथम' म्हणत केली घोषणा
राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर रमेश परदेशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संचलनातील स्वतःचा गणवेशातील एक फोटो पुन्हा फेसबुकवर पोस्ट केला आहे. ही पोस्ट करताना त्यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. "मी माझ्या विचारांसोबत, राष्ट्र प्रथम" अशी टॅगलाइन वापरत, तसेच "जय हिंद, जय महाराष्ट्र.." असे कॅप्शन देत त्यांनी अप्रत्यक्षपणे मनसे सोडल्याची अधिकृत घोषणा केली आहे.