जाहिरात

Latur News : लातूरमध्ये देशमुख काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष चिघळला, अमित देशमुखांच्या आदेशानंतर पक्षात खळबळ

Amit Deshmukh vs Dilip Rao Deshmukh : लातूरच्या राजकारणातील अमित देशमुख (पुतण्या) आणि दिलीपराव देशमुख (काका) यांच्या गटांमधील राजकीय संघर्ष निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाला आहे.

Latur News : लातूरमध्ये देशमुख काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष चिघळला, अमित देशमुखांच्या आदेशानंतर पक्षात खळबळ
Amit Deshmukh vs Diliprao Deshmukh : अमित देशमुखांच्या आदेशाचा काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.
लातूर:

विष्णू बुरगे, प्रतिनिधी

Amit Deshmukh vs Dilip Rao Deshmukh, Latur News : लातूरच्या राजकारणातील अमित देशमुख (पुतण्या) आणि दिलीपराव देशमुख (काका) यांच्या गटांमधील राजकीय संघर्ष निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाला आहे. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी निवडलेला उमेदवार अंतिम क्षणी बदलण्यात आला, आणि या अचानक झालेल्या निर्णयामागे या दोन प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानांमधून आलेले परस्परविरोधी संदेश कारणीभूत ठरले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

'आशियाना'तून हिरवा कंदील, पण 'गढी'वरून अचानक ब्रेक

निलंगा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे निवासस्थान असलेल्या 'आशियाना' मधून त्यांना हिरवा कंदीलही मिळाला होता. मात्र, अर्ज भरण्याच्या अगदी अंतिम क्षणी, आमदार अमित देशमुख यांच्या निवासस्थान असलेल्या 'गढी' वरून एक महत्त्वाचा संदेश आला आणि नाईकवाडे यांची उमेदवारी अचानक बदलण्यात आली.

या बदलामुळे, नाईकवाडे यांच्याऐवजी हमीद शेख यांना काँग्रेसचा ए.बी. फॉर्म (अधिकृत उमेदवारी अर्ज) देण्यात आला. ही घटना इतकी अनपेक्षित होती की, गेल्या अनेक दिवसांपासून जनसंपर्क करून तयारी करणाऱ्या नाईकवाडे यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. या घडामोडींमुळे अनेक कार्यकर्त्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले आणि काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला.

(नक्की वाचा : Dombivli News: निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा जप्त, राजकीय गुन्हेगाराला बेड्या )
 

मनधरणीचे प्रयत्न सुरू, पण 'कोडे' कायम

नाईकवाडे यांची उमेदवारी कापल्यानंतर निर्माण झालेली नाराजी आणि तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी तातडीने हालचाली सुरू केल्या. जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, निरीक्षक विजय देशमुख आणि जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी रात्री उशिरापर्यंत नाईकवाडे यांच्या निवासस्थानी तळ ठोकून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले.

इतकेच नाही, तर माजी मंत्री अमित देशमुख यांनीही दूरध्वनीवरून अजित नाईकवाडे यांच्याशी संपर्क साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. नाईकवाडे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी यापूर्वी नगरसेवक निवडणुकीत भाजपच्या मोठ्या उमेदवारांना हरवले आहे. मात्र, 'आशियाना'तून अंतिम झालेली उमेदवारी 'गढी'वरून आलेल्या संदेशानंतर नेमकी कोणत्या कारणामुळे कापली गेली, याचे कोडे अजूनही कार्यकर्त्यांना उलगडलेले नाही.

( नक्की वाचा : Rohini Acharya: लालूंना किडनी देणाऱ्या रोहिणी आचार्यांवर तेजस्वींनी चप्पल का फेकली? 'यादवी' ची Inside Story )
 

 'देशमुख विरुद्ध निलंगेकर' गटबाजी गडद

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीतील हा गोंधळ काँग्रेसमधील जुन्या गटबाजीला अधिक गडद करणारा ठरला. मागील विधानसभा निवडणुकीपासून निलंगा मतदारसंघात 'देशमुख विरुद्ध निलंगेकर' असा राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या निवडणुकीत, उमेदवार निश्चितीवरून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्यात समन्वय साधण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र पक्षश्रेष्ठींना त्यात फारसे यश आले नाही.

या दोन गटांमधील मतभेद दूर करण्यासाठीच खास जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी बरीच चर्चा झाल्यानंतर, काही नगरसेवकपदांच्या वाटाघाटीसह, नगराध्यक्षपदासाठी अजित नाईकवाडे यांच्या नावावर संमती मिळाली होती. परंतु, शेवटच्या क्षणी अचानक माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांच्या नावावर एबी फॉर्म लावण्याची कुजबूज सुरू झाली आणि विरोधकांनी याला विरोध केल्याने तणाव वाढला.

नाईकनवडे काय करणार?

शहराध्यक्ष असूनही ऐनवेळी उमेदवारी डावलल्यामुळे अजित नाईकवाडे सध्या नाराज आहेत. त्यांनी नगरसेवक पदासाठी प्रभागातही आपला अर्ज दाखल केला आहे. आता ते हा अर्ज कायम ठेवणार की मागे घेणार, याकडे केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांचेच नव्हे, तर संपूर्ण निलंगा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. नाईकवाडे यांच्या भूमिकेवर निलंगा नगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसचे यश मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com