Mumbai News: एका चुकीमुळे घडली मुलुंड मेट्रो दुर्घटना; पोलीस तपासात धक्कादायक बाब आली समोर

Mulund Metro Slab Collapse: मुलुंड मेट्रो दुर्घटनेत निष्काळजीपणा उघड झाला असून, भिंतीचा भाग एकमेकांना जोडणारी 'इंटरलॉकिंग' प्रणाली तोडल्याने हा अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुलुंडमध्ये मेट्रो 4 (वडाळा-कासारवडवली) मार्गिकेच्या कामादरम्यान शनिवारी पॅरापेट भिंतीचा भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुरक्षेबाबतचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  कोसळलेला सिमेंटचा भाग योग्य प्रकारे सुरक्षित करण्यात आला नव्हता आणि त्याची 'इंटरलॉकिंग' यंत्रणा सदोष होती, असं पोलीस तपासात समोर आलं. 

तपासातील धक्कादायक खुलासे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामागे तांत्रिक निष्काळजीपणा आहे.  दोन पॅरापेट भिंतींना एकमेकांना जोडून ठेवणारी 'इंटरलॉकिंग' प्रणाली गॅस कटरने किंवा अन्य कामादरम्यान कापली गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे तो भलामोठा स्लॅब केवळ नावापुरता तिथे टिकून होता. हे बांधकाम 12-13 फेब्रुवारीच्या रात्री करण्यात आले होते. परंतु ते पूर्णपणे सिमेंटने पक्के करण्यात आले नव्हते. पुढील 12 तासांत हा भाग हळूहळू सरकला आणि शेवटी रस्त्यावर चालणाऱ्या रिक्षा व कारवर कोसळला. घटना घडली तेव्हा किंवा काम सुरू असताना तिथे जबाबदार सुपरवायझर हजर नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

5 अधिकाऱ्यांना अटक आणि कारवाई

मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 105 (सदोष मनुष्यवध) आणि 110 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिलान रोड बिल्डटेकचे प्रकल्प संचालक हरीश चौहान, प्रकल्प व्यवस्थापक कुलदीप सपकाळ, सौरभ सिंह, प्रशांत भोईर आणि डीबी हिल एलबीजीचे अवधूत इनामदार यांना अटक करण्यात आली आहे. MMRDA ने मुख्य कंत्राटदाराला 5 कोटी रुपये आणि सल्लागार कंपनीला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच कार्यकारी अभियंता सत्यजीत साळवे यांना निलंबित करण्यात आले आहे. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात याबाबतचं सविस्तर वृत्त आलं आहे.

(नक्की वाचा-  UTS App: रेल्वे प्रवाशांसाठी सोईस्कर असलेलं UTS अ‍ॅप बंद होणार; नवीन अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार)

मृतांच्या नातेवाईकांना मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही सरकार आणि MMRDA उचलणार आहे.

Advertisement
Topics mentioned in this article