विशाल पाटील
मुंबईत मराठी मनपा शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढल आहे. मराठी शाळा बंद पडण्याची अनेक कारणं आहेत. मात्र भांडूप येथील खिंडीपाडा मनपा मराठी शाळा बंद पडण्याचे कारण सरकारी यंत्रणा आणि अधिकारी वर्ग आहे. 1971 साली स्थापन झालेली 4 थी पर्यंतची शाळा मुबलक विद्यार्थी असताना सुद्धा बंद झाली. सरकारी अधिकाऱ्यांमुळे ही शाळा बंद पडली आहे. भांडुप मधील खिंडीपाडा येथील मनपा मराठी शाळा या शाळेची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. खिंडीपाड हा परिसर झोपडपट्टी असलेला भाग आहे. या शाळेत या परिसरातील आणि आदीवासी पाडे असलेल्या भागातील जवळपास 200 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते.
मात्र ही शाळा गेल्या काही वर्षापासून बंद आहे. शाळेची इमारत धोकादायक आहे. त्यामुळे डागडुजी करण्यासाठी म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर दुसऱ्या ठीकाणी करण्यात आले. मात्र या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नशिबी वनवण आली. सर्वच विद्यार्थ्यांनी खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतले. पण ही शाळा पुन्हा सुरू व्हावी यासाठी विद्यार्थी आणि येथील माजी विद्यार्थी तसेच नागरिकांची मागणी आहे. पहीली ते चौथीपर्यंत ही शाळा आहे. शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कागदी घोडे नाचू लागले होते. महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र व्यवहार टोलवाटोलवीत शाळा बंद झाली.
कलेक्टर लॅण्डवर जमीन असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची एनओसी मिळणे गरजेचे आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय एनओसी देत नसल्यामुळे शाळेची डागडुजी रखडली. ही शाळा पुन्हा सुरू व्हावी यासाठी अनेक स्तरातून प्रयत्न केले जातात. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून सुद्धा पत्रव्यवहार सुरू आहे. जर ही शाळा लवकर सुरू झाली नाही तर आम्हा शिक्षकांनाच रस्त्यावरती उतरावे लागेल अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी घेतला आहे.
या शाळेबाबत महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी ही आपली प्रतिक्रीया दिली आहे. आम्ही जाणीवपूर्वक कोणताही शाळा बंद करत नाही. मात्र हा प्रश्न जाणून घेऊ असं त्यांनी सांगितलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे कशा पद्धतीने गंभीर परिणाम होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.