
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षण मोहिमेदरम्यान, पाटण्यामध्ये एका कुत्र्याचं रहिवाशी प्रमाणपत्र बनवल्याचा प्रकार समोर आला होता.'डॉग बाबू' च्या निवास प्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका झाली होती. हे प्रकरण अजून शांत झालं नव्हतं की, आता मोतिहारीमध्येही असाच एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यावेळी तर थेट भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा हिच्या नावाचं रहिवासी प्रमाणपत्र बनवण्यासाठी अर्ज दाखल झाल्याचं समोर आलं आहे.
मोनालिसाच्या नावाचं निवास प्रमाणपत्र बनवण्यासाठी अर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. पाटणा जिल्ह्यातील मसौढी येथे 'डॉग बाबू' नावाच्या कुत्र्याचं निवास प्रमाणपत्र बनल्यानंतर, आता मोतिहारी जिल्ह्यातील कोटवा ब्लॉकमधील अंचल कार्यालयात काही समाजकंटकांनी भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा फोटो लावून निवास प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या या ऑनलाइन अर्जामध्ये, भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा फोटो वापरण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, यामध्ये तिचं नाव 'सोनालिका ट्रॅक्टर', वडिलांचं नाव 'स्वराज ट्रॅक्टर' आणि आईचं नाव 'कार देवी' असं भरून ऑनलाइन अर्ज करण्यात आला होतं. मात्र, हा अर्ज प्राप्त होताच अधिकाऱ्यांच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात यांनी तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आणि हा बनावटपणा करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.बिहारमध्ये असे बनावट प्रमाणपत्र बनवण्याचे प्रकार थांबणार कधी, हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world