मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून प्रवाशांसाठी खुला झालेला आहे. इतका मोठा रस्ता खुला झाला असल्याने एकीकडे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कोस्टल रोडवरुन एक रस्ता वरळीला आणि दुसरा रस्ता हाजीअलीला जातो. मात्र प्रशासनाने बोर्डावर दोन्ही ठिकाणांना वेगळीच नावं दिल्यानं प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्गावरील दक्षिणेकडील बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. इंधन बचतीसोबतच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. मात्र असं असलं तरी या कोस्टल रोडवर वरळी आणि हाजी अली येथे जाण्यासाठी ती नावं देण्याऐवजी बॅरिस्टर रजनी पटेल चौक (वरळी-लोटर जेट्टी) आणि वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली चौक) अशी नावं देण्यात आली आहेत. मात्र वरळी आणि हाजी अली अशी नावं दिली नसल्याने रस्त्याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे विभाजन होण्यापूर्वीच्या जंक्शनवर गाड्यांची स्पीड कमी होताना दिसत आहे. या ठिकाणी येऊन गाड्या थांबत विचारपूस करताना दिसत आहे.
नक्की वाचा - Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला
बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक अशी नावं देण्यात आली आहेत. मात्र यातून कोणता रस्ता हाजीअली आणि कोणता रस्ता वरळीला जातो हे स्पष्ट होत नाही. अशावेळी दोनपैकी प्रवाशांनी कोणता रस्ता निवडावा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील प्रवाशांचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाला येथील बोर्डावरील नावांमध्ये दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोस्टल रोड रस्ता मार्ग...
आता प्रामुख्याने मरीन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे 6.25 किलोमीटर लांबीचा मार्ग खुला होत आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील बोगद्याचा वापर करता येणार आहे. या बोगद्यांवरून उतरून किंवा प्रवेश करून वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world