ऋतिक गणकवार, मुंबई
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. पुष्पा गुप्ता असे मृत महिलेचे नाव आहे. कौटुंबिक वादातून आणि पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 20 तासांत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
पुष्पा गुप्ता यांना त्यांचा पती राजू वारंवार मारहाण करत असे. या छळाला कंटाळून पुष्पा यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पुष्पा यांचा छळ पाहून त्यांचे दीर कमलेश गुप्ता जे भारतीय लष्करात जवान आहेत हे पुष्पा यांना सुरक्षितपणे आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी मुंबईत आले होते. सोमवारी गावी जाण्यासाठी ते मुलुंड स्थानकावर पोहोचले. मात्र, राजूने कमलेश यांचे आर्मी 'आयडी कार्ड' चोरले होते. ते परत मिळवण्यासाठी कमलेश पुन्हा राजूच्या घरी गेला.
(नक्की वाचा- VIDEO: किंकाळ्या, धडपड अन् वेदना; भटक्या कुत्र्यांनी 15 मिनिट लचके तोडले, महिलेचा तडफडून जागीच मृत्यू)
रेल्वे स्थानकावरील थरार
कमलेश घरी गेल्याची संधी साधून राजू गुप्ताने आधी आपल्या मुलाला (आर्यन) आणि कमलेशला घरात कोंडून ठेवले. त्यानंतर तो तातडीने मुलुंड रेल्वे स्थानकावर पोहोचला. फलाटावर उभ्या असलेल्या पुष्पा यांना काही कळायच्या आत राजूने त्यांना समोरून येणाऱ्या जलद लोकलखाली ढकलून दिले. लोकलच्या धडकेमुळे आणि चाकाखाली आल्यामुळे पुष्पा यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर राजू तिथून फरार झाला होता.
(नक्की वाचा- Shocking News: हृदयद्रावक! मेकॅनिकचा एक सल्ला अन् अख्ख कुटुंब उद्ध्वस्त; 3 नातवांसह आजोबांचा झोपेतच मृत्यू)
20 तासांत आरोपी गजाआड
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध घेऊन अवघ्या 20 तासांच्या आत राजू गुप्ता याला अटक केली. सध्या त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.