राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ratnagiri News: मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) अपघातांचे सत्र सुरूच असून बुधवारी (15 जुलै) सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. रत्नागिरीतील लांजा रेस्ट हाऊसजवळ (Lanja Rest House) झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे कुटुंब गोव्यावरून मुंबईच्या दिशेने परतत असताना त्यांच्या गाडीला हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे, तर इतर दोन जण गंभीर जखमी आहेत.
कारची डंपरला जोरदार धडक, कारचा चुराडा
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील आग्रीपाडा (Agripada, Mumbai) येथे राहणारे हे कुटुंब गोव्याला गेले होते. तिथून क्रेटा कारने (Creta Car) मुंबईच्या दिशेने परत येत असताना सकाळी 7 वाजेच्या सुमारास लांजा रेस्ट हाऊसजवळ त्यांच्या गाडीने एका डंपरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की क्रेटा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भयंकर अपघातात कारमधील दोन महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
(नक्की वाचा: Mumbai Goa Highway मुंबई-गोवा हायवेने प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या! मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प, निसर्गाचा कोप)
एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींना तत्काळ लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात (Lanja Rural Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घरी परतणाऱ्या या कुटुंबावर अचानक काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.