भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना 28 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून ते 30 जुलै 2025 रोजी रात्री 8.30 वाजेपर्यंत 3.8 ते 4.3 मीटर उंच लाटांचा इशारा दिला आहे. या काळात लहान बोटींना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समुद्राची धूप आणि उंच लाटांमुळे किनारी भागाला तडाखा बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पुणे घाटात ऑरेंज अलर्ट; नद्यांना पूर
राज्यात पुढील 24 तासांसाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोसीखुर्द प्रकल्प येथून 2,47,003 क्युसेक, उजनी धरणातून 41,600 क्युसेक आणि भिमा नदी दौंड पूल येथून 32,640 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
( नक्की वाचा: ओला, उबर, रॅपिडो विसरा! थेट राज्य सरकारच सुरु करणार खास सेवा )
वाशिममध्ये पैनगंगा नदीला पूर, वाहतूक विस्कळीत
वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आल्याने सरपखेड धोडप बुद्रुक मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणात 91,548 क्युसेक पाण्याची आवक होत असून, धरणातून 1,20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
( नक्की वाचा: सलीम लंगडाची टीप आणि मुंबई पोलिसांचे कर्नाटकात सिक्रेट मिशन )