जाहिरात

Mumbai Lake Water Level : मुंबईत दमदार, धरण क्षेत्रात पातळ धार; धरणातील पाणीसाठा वाढण्याऐवजी घटला

भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या तलावांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो.  

Mumbai Lake Water Level : मुंबईत दमदार, धरण क्षेत्रात पातळ धार; धरणातील पाणीसाठा वाढण्याऐवजी घटला
मुंबई:

गेल्या 24 तासांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे. रविवारी दिवसभर पावसाचा तडाखा अनुभवायला मिळाला. सोमवारीही हा जोर कमी झाल्याचे दिसत नव्हते. असं असलं तरी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमधील पाण्याची पातळी सोमवारी 10 टक्क्यांपेक्षा कमीच राहिली आहे. मुंबईला याच तलावांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो.  मुंबईकरांची तहान भागवण्यााठी या तलावांमधील पाणी पातळी वाढणं अत्यंत गरजेचं आहे. चांगला पाऊस झाला तर मुंबईची वर्षभराची गरज भागवून थोडे पाणी शिल्लक राहते. मे महिन्यात जोरदार पाऊस पडला मात्र जून महिन्यात पावसात मोठा खंड पडला होता. 

सात तलावांमधून होतो मुंबईला पाणीपुरवठा

नक्की वाचा : शिंदेंच्या ठाण्यात मराठीला तिसऱ्या भाषेचा दर्जा, प्रसिद्ध इंग्रजी शाळेची मुजोरी ; मनसेचा निर्वाणीचा इशारा

भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या तलावांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो.  हे तलाव मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये असून या सगळ्या तलावांची मिळून एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता 14.47 लाख दशलक्ष लिटर आहे.  सोमवारी, या सातही तलावांमध्ये मिळून उपयुक्त पाणीसाठा त्यांच्या एकूण 14,47,363 दशलक्ष लिटर क्षमतेच्या केवळ 8.6% इतकाच नोंदवला गेला. रविवारी नोंदवलेल्या 8.69% च्या तुलनेत यात आणखी घट झाली आहे.

नक्की वाचा : रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबई,ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट

काय आहे तलावांची सद्यस्थिती

अप्पर वैतरणा: या तलावाची पूर्ण पुरवठा पातळी 603.51 मीटर असून, आजची पातळी 595.53 मीटर आहे. यामध्ये कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही. तलावात 2065 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. 15 जून 2025 रोजी 4 मिमी पाऊस नोंदवला गेला, तर एकूण पाऊस 28 मिमी झाला आहे.

मोडकसागर: 163.15 मीटर पूर्ण पुरवठा पातळी असलेल्या या तलावाची आजची पातळी 149.82 मीटर आहे, जी 0.02 मीटरने घटली आहे. यामध्ये 33590 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. 15 जून रोजी 23 मिमी पाऊस पडला असून, एकूण पाऊस 128 मिमीवर पोहोचला आहे.

तानसा: या तलावाची पूर्ण पातळी 128.63 मीटर असून, आजची पातळी 120.10 मीटर आहे. यामध्येही 0.02 मीटरची घट झाली आहे. तानसात 13630 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. 15 जून रोजी 28 मिमी पाऊस झाला, तर एकूण पाऊस 130 मिमी नोंदवला गेला.

मध्य वैतरणा: 285.00 मीटर पूर्ण पातळी असलेला हा तलाव 239.78 मीटर पातळीवर आहे, ज्यात 0.04 मीटरची वाढ झाली आहे. या तलावात 20655 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. 15 जून रोजी 60 मिमी पावसाची नोंद झाली, तर एकूण पाऊस 154 मिमी झाला आहे.

भातसा: 142.07 मीटर पूर्ण पातळी असलेल्या भातसा तलावाची आजची पातळी 108.25 मीटर आहे, जी 0.10 मीटरने कमी झाली आहे. यात 43003 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. 15 जून रोजी 33 मिमी पाऊस पडला असून, एकूण पाऊस 216 मिमी झाला आहे.

विहार: 80.12 मीटर पूर्ण पातळी असलेल्या विहार तलावाची आजची पातळी 76.30 मीटर असून, यात 0.06 मीटरची वाढ झाली आहे. तलावात 9225 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. 15 जून रोजी 43 मिमी पाऊस पडला असून, एकूण पाऊस 113 मिमी झाला आहे.

तुळशी: 139.17 मीटर पूर्ण पातळी असलेल्या तुळशी तलावाची आजची पातळी 134.05 मीटर आहे, ज्यात 0.02 मीटरची वाढ झाली आहे. यात 2303 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. 15 जून रोजी 66 मिमी पाऊस झाला असून, एकूण पाऊस 227 मिमी झाला आहे.

एकूण उपयुक्त पाणीसाठा:
2025 मध्ये सर्व तलावांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 1,24,471 दशलक्ष लिटर नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी, म्हणजेच 2024 मध्ये याच दिवशी हा साठा 78,499 दशलक्ष लिटर होता, तर 2023 मध्ये तो 1,25,055 दशलक्ष लिटर होता.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात दमदार पाऊस होत असला तरी, पाणीपातळीत अपेक्षेप्रमाणे वाढ न झाल्यामुळे मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com