Mumbai Local : नव्या वर्षाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नागरिक नव्या वर्षात काय नवीन करायचं याचं प्लानिंग करीत आहेत. दरम्यान रेल्वेकडून नागरिकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर होण्यासाठी रेल्वेने कंबर कसली आहे.
नव्या लोकल अन् एक्सप्रेस गाड्या सुरू होणार...
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर येत्या २०३० पर्यंत ७४९ नव्या लोकल फेऱ्या तर १३३ मेल-एक्सप्रेस गाड्या सुरू होणार असल्याची माहिती आहे. मुंबईसह ४८ प्रमुख शहरांमध्ये रेल्वे वाहन क्षमता दुप्पट करण्याची योजना हाती घेतली आहे.
मध्य रेल्वेत मोठा बदल...
मध्य रेल्वेवर पनवेल-कळंबोली टर्मिनस, लोकमान्य टर्मिनस-२, कल्याण आणि मेगा परळ-टिळक टर्मिनस मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे २२ फलाट आणि ३६ मार्गिका उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय कल्याण यार्डातील कामं, १५ डब्यांसाठी प्लॅटफॉर्म विस्तार, कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत तिसरी-चौथी मार्गिका, पनवेल फलाट क्रमांक चारची पुनर्बांघणी पूर्ण करणे, यानंतर ५८४ नव्या लोकल फेऱ्या सुरू करणार असल्याची माहिती आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पश्चिम रेल्वेवर टर्मिनस सुरू होणार....
२०२६ या वर्षात तीन फलाटांचे जोगेश्वरी टर्मिनस सुरू होणार आहे. दादर, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये अतिरिक्त मार्गिकांची भर पडणार आहे. परिणामी लोकल आणि मेल-एक्सप्रेस वाहतूक स्वतंत्र होऊन १६५ नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्याची तयारी आहे. महत्त्वाचं म्हणजे गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गिका कार्यान्वित होणार आहे. याशिवाय वांद्रे-अंधेरी दरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.