Kalamboli Mother Killed daughter : आई आणि मुलगी यांच्या नात्याची दुसऱ्या कोणत्याही नात्याशी तुलना करता येत नाही. दोघींचं एकमेकींवर जीवापाड प्रेम असतं, कोणाहीपेक्षा लेक आईचं मन समजून घेऊ शकते असं म्हणतात. मात्र पनवेलमधील कळंबोलीमध्ये घडलेल्या घटनेमुळे या नात्याला काळीमा फासला गेला आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या लेकीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
विविध कारणं सांगत आईने मुलीला संपवलं...
कळंबोलीतील सेक्टर १ मधील गुरुसंकल्प हाऊसिंग सोसायटीत हा प्रकार घडला. या सोसायटीत आयटी इंजिनिअर तरुण आपल्या बीएस्सी शिक्षण घेतलेल्या ३० वर्षांच्या पत्नीसोबत राहतो. या महिलेला मुलगी नको होती. विशेष म्हणजे त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला लहानपणापासून बोलण्यात अडचण जाणवत होती. ती मराठीऐवजी हिंदी भाषेचे शब्द जास्त वापरायची. तिच्या बोलण्यात अधिकांश हिंदी भाषा असायची. मुलीच्या आईला हे आवडत नव्हतं. मुलीच्या आरोग्याच्या अडचणीमुळे तिची आई मानसिक तणावात होती. अनेकदा तिने पतीला अशी मुलगी नको असल्याचं म्हटलं होतं. पती तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता, अशीही माहिती समोर आली आहे. लोकसत्ताने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हृदयविकाऱ्याचे झटक्याने मृत्यूचा बनाव...
२३ डिसेंबरच्या रात्री महिलेने मुलीची हत्या केली आणि तिला बेडवरच झोपवलं. पती घरी आल्यानंतर त्यांनी मुलीला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती उठत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. तेथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांना या सर्व प्रकारावर संशय आला. त्यांनी डॉक्टरांकडे शवविच्छेदनाची चौकशी केली. शेवटी अहवालात मुलीच्या श्वसनमार्गात अडथळा आल्याचं लक्षात आलं. शेवटी पोलिसी खाक्या दाखवित पती-पत्नीची चौकशी करण्यात आली. यानंतर आईनेच खून केल्याची कबुली दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world