Mumbai News : मुंबईतील सर्वच लोकल होणार वातानुकुलीत, भाडेवाढही होणार नाही

लवकरच भारतीय रेल्वेकडून याची औपचारिक घोषणा केली जाईल. मुंब्रा येथे 09 जून रोजी लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या अपघातानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईतील लाखो लोकल प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतील सर्व डबे आता वातानुकूलित (AC) आणि स्वयंचलित दरवाजांसह बदलले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यासाठी प्रवाशांना सध्याच्या भाड्यात कोणतीही वाढ द्यावी लागणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली असून, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः आपल्याला या निर्णयाची माहिती दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. लवकरच भारतीय रेल्वेकडून याची औपचारिक घोषणा केली जाईल. मुंब्रा येथे 09 जून रोजी लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या अपघातानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेनंतर, अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपनगरीय रेल्वे डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची विनंती आपण केंद्राला करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.

(नक्की वाचा-  Pune - Lonavala tour: एसी बसने लोणावळा टूर, तिकीट फक्त 500 रुपये; पटकन करा प्लॅनिंग)

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री वैष्णव यांना उपनगरीय गाड्यांना सध्याचे भाडे न वाढवता मेट्रोसारखे डबे देण्याची विनंती केली होती.  रेल्वे मंत्र्यांनी याबाबत सांगितले की, ते याबाबत सकारात्मक निर्णय घेत आहेत आणि लवकरच अधिकृत घोषणा करतील.". त्यांनी स्पष्ट केले की, हे दरवाजे जुन्या डब्यांना रेट्रोफिटेड केले जाणार नाहीत, तर स्वयंचलित दरवाजांसह नवीन वातानुकूलित डबे उपलब्ध केले जातील. त्यासाठी वेगळी भाडेवाढ केली जाणार नसल्याचे देखील त्यांनी अधोरेखित केले.

(नक्की वाचा- Anil Parab : गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं मुंबईत डान्सबार, अनिल परब यांचा खळबळजनक आरोप)

दोन दिवसांपूर्वी राज्य विधानसभेत या विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खाजगी आस्थापनांमध्ये कामाच्या वेळा विभागून गर्दी कमी करण्याची शक्यता तपासण्यासाठी एका विशेष कृती दलाची स्थापना करण्याचा प्रस्ताव दिला होता. गेल्या 3 वर्षांत लोकल ट्रेनमधून प्रवास करताना 7,565 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 7,293 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Advertisement

गर्दीमुळे लोक धोकादायक परिस्थितीत प्रवास करत आहेत. मुंबईमध्ये आता दोन प्रकारच्या रेल्वे प्रवाशांच्या श्रेणी आहेत. जे मेट्रोमध्ये आरामात प्रवास करतात आणि जे लोकल ट्रेनमध्ये असुरक्षित परिस्थितीत प्रवास करतात. हे बदलणे आवश्यक आहे," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 
 

Topics mentioned in this article