तुम्ही मुंबई लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून योग्य तिकीट किंवा पासशिवाय प्रवास करण्याचा विचार करत असाल तर सावधान! मध्य रेल्वे १६ जूनपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करणार आहे.
फस्ट क्लासमधील प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे आणि परवानगीशिवाय प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे हा त्याचा उद्देश आहे. शनिवारी सीआरने सांगितल्यानुसार, प्रथम श्रेणीच्या डब्यातून योग्य तिकीट नसताना प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे. उद्या १६ जूनपासून विशेष मोहिमेअंतर्गत, गर्दीच्या वेळी प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी पथके तैनात केली जातील. वैध तिकीट नसलेल्यांविरोधात कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.
नक्की वाचा - Ghatkopar station : घाटकोपर स्टेशन प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला प्रवासी, पुढे काय घडलं?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या प्रवाशाकडे प्रथम श्रेणीचे वैध तिकीट किंवा पास नसल्यास तेथेच दंड आकारला जाईल. जर एखाद्या प्रवाशाने दंड भरण्यास नकार दिला तर त्याला पुढील स्थानकावरील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडे सोपवले जाईल. गरज पडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.
रेल्वेच्या या तपासणी पथकांसोबत रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) कर्मचारी देखील उपस्थित असतील. हे पथक वेगवेगळ्या लोकल गाड्यांमध्ये रोटेशनल आधारावर "एंड टू एंड" तपासणी करतील, म्हणजेच ट्रेनच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक डब्याची तपासणी केली जाईल.