जाहिरात

Mumbai Local: ऑफिस सुटलं पण घरी कसं जाणार? मध्य रेल्वेवर अर्ध्या तासापासून गोंधळ, प्रवाशांचा संताप

Central Railway Accident: मुंबईकर ऑफिस सुटल्यानंतर घराकडे निघण्याच्या तयारीत असतानाच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Mumbai Local: ऑफिस सुटलं पण घरी कसं जाणार? मध्य रेल्वेवर अर्ध्या तासापासून गोंधळ, प्रवाशांचा संताप
Mumbai Local : . लोकल अचानक थांबल्यामुळे अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालत जवळचे स्टेशन गाठणे पसंत केले.
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Central Railway Accident: मुंबईकर ऑफिस सुटल्यानंतर घराकडे निघण्याच्या तयारीत असतानाच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भायखळा आणि चिंचपोकळी स्थानकांदरम्यान एका व्यक्तीला लोकलची धडक बसल्याने सीएसएमटीच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत.

नेमकं काय घडलं?

मध्य रेल्वेवर बदलापूर ते सीएसएमटी या मार्गावर धावणाऱ्या एका लोकलखाली रेल्वे रूळ ओलांडणारा एक व्यक्ती आला. भायखळा आणि चिंचपोकळी स्थानकांच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर संबंधित व्यक्तीला ट्रेनखालून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या प्रक्रियेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व लोकल गाड्या जिथल्या तिथे थांबवण्यात आल्या आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून ही वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

( नक्की वाचा : BJP MLA: मुंबईच्या बड्या भाजपा आमदाराला 'पीएमओ'चा दणका! पंतप्रधान मोदींनीच दिले मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश )

एकापाठोपाठ 4 लोकल रखडल्या

या अपघातामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एकापाठोपाठ एक अशा 4 लोकल अडकून पडल्या. यामध्ये 3 लोकल तर अगदी सलग उभ्या होत्या. लोकल अचानक थांबल्यामुळे अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालत जवळचे स्टेशन गाठणे पसंत केले. मात्र, ज्या गाड्या पुलावर किंवा मधल्या भागात थांबल्या आहेत, तिथल्या प्रवाशांना लोकलमध्ये ताटकळत राहावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल, असे सांगण्यात येत आहे.

मुंबईकरांचे ऐन गर्दीत हाल

संध्याकाळची वेळ ही ऑफिस सुटण्याची वेळ असल्याने मुंबई लोकलच्या सर्व स्टेशन्सवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अशातच मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. केवळ सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलच नाही, तर त्याचा परिणाम उपनगरांकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही होण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळ ओलांडण्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com