Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाची निवडणूक लांबणीवर! भाजपला कसा होणार फायदा?

Mumbai Mayor News: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा जिंकून 'किंगमेकर'ची भूमिका बजावली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

 विशाल पाटील, मुंबई

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागून 11 दिवस उलटले तरी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सत्तावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजपच्या रणनीतीमुळे मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राजकीय डावपेच आखत भाजपने ही प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात यश मिळवले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा जिंकून 'किंगमेकर'ची भूमिका बजावली आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी, महापौर कोणाचा आणि किती काळासाठी, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. यामुळेच भाजपने आपल्या नगरसेवकांची गटनोंदणी अद्याप केलेली नाही.

नियमांचा 'असा' झाला वापर

महानगरपालिकेच्या नियमानुसार, सर्व विजयी नगरसेवकांच्या गटाची नोंदणी कोकण आयुक्तांकडे झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत महापौर निवडीची प्रक्रिया राबवणे आवश्यक असते. मात्र, भाजपने ही नोंदणीच लांबणीवर टाकल्याने प्रशासनाला निवडणूक जाहीर करता आलेली नाही. परिणामी, 31 जानेवारीला होणारी संभाव्य निवड आता फेब्रुवारीत ढकलली गेली आहे.

(नक्की वाचा- Solapur News: जि.प. निवडणुकीसाठी लंडनच्या बॅरिस्टर पदवीचा त्याग; 24 वर्षांच्या या उमेदवाराची जोरदार चर्चा)

भाजपला या वेळकाढूपणामुळे काय फायदा होणार?

भाजपला अधिकचा वेळ मिळाल्याने शिंदे गटासोबत महापौरपद आणि स्थायी समितीच्या जागांबाबत वाटाघाटी करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. अपक्ष किंवा इतर पक्षांतील नाराज नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी संधी यादरम्यान भाजपकडून शोधली जाऊ शकते. 

Advertisement

उद्धव ठाकरे गटाला महापालिकेत कोणतीही राजकीय संधी किंवा महत्त्वाची पदे मिळू नयेत यासाठी रणनीती भाजपकडून आखली जाऊ शकते. सध्या पालिकेवर प्रशासकाचे नियंत्रण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर पकड असल्याने अप्रत्यक्षपणे सत्ता भाजपच्याच हाती आहे.

महायुतीमधील पेच काय?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईचा महापौर शिवसेनेचाच (शिंदे गट) असावा, अशी आग्रही मागणी या गटाने केली आहे. तर सर्वात मोठा पक्ष असल्याने महापौरपद भाजपकडेच असावे, असे संकेत भाजप नेत्यांनी दिले आहेत. दोन्ही पक्षांनी खबरदारी म्हणून आपल्या नगरसेवकांना आलिशान हॉटेलमध्ये हलवले आहे, जेणेकरून फोडाफोडी टाळता येईल.

Advertisement

(नक्की वाचा-  Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप, कोण-कोणत्या बँका होणार सहभागी? काय आहेत मागण्या?)

कशी असेल महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया?

महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष बैठक मुंबई महानगर पालिकेत घेण्यात येईल. सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौरपदाची निवड करायची असल्यास महानगरपालिका सचिव आयुक्तांशी चर्चा करून तारीख निश्चित करतील.  या बैठकीची नोटीस किमान 3 दिवस आधी निवडून आलेल्या सदस्याना द्यावी लागणार आहे. 

अशी बोलावलेली विशेष बैठक रद्द किंवा तहकूब करता येणार नाही.  महापौरपदासाठी इच्छुक उमेदवार महापालिका सचिवांकडे आपला अर्ज सादर करतील. महापौरपदाच्या उमेदवाराच्या अर्जासोबत एक अनुमोदन आणि सूचक म्हणून सदस्यांची सही असणे अनिवार्य आहे.  जर महापौरपदासाठी एकच उमेदवार असेल तर पीठासीन अधिकारी महापौर म्हणून संबंधित सदस्याची महापौर म्हणून घोषणा करतील. 

Advertisement
Topics mentioned in this article