संकेत कुलकर्णी, पंढरपूर
उच्च शिक्षणासाठी लंडनला जाणे आणि तिथून 'बॅरिस्टर' ही प्रतिष्ठित पदवी मिळवणे, हे कोणत्याही तरुणाचे स्वप्न असते. मात्र, सांगोला तालुक्यातील जवळा येथील यशराजे दीपक साळुंखे या तरुणाने या स्वप्नाचा त्याग केला आहे. जवळा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत, यशराजे आता ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या यशराजेच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न आणि लंडनच्या बॅरिस्टर पदवीचा मोह बाजूला सारून, सांगोला तालुक्यातील हा तरुण 'मिनी मंत्रालया'च्या रिंगणात उतरला आहे.
शिक्षणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य
यशराजे यांनी आपले एलएलबीचे (LLB) शिक्षण पूर्ण केले असून, पुढील बॅरिस्टर पदाच्या शिक्षणासाठी ते लंडनला जाणार होते. मात्र, झेडपी निवडणुका जाहीर होताच जवळा गटातील ग्रामस्थांनी त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला.
अवघ्या 24 वर्षांचे यशराजे 'जेन-झी' (Gen Z) पिढीतील अपडेटेड विचार घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. "बॅरिस्टर होऊन न्यायालयात वकिली करण्याऐवजी, आता प्रशासनासमोर लोकांची वकिली करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे," असे यशराजे साळुंखे यांनी सांगितले.
(नक्की वाचा- Dharashiv Politics: महायुती जाहीर, मैदानात तणाव! धाराशिवमध्ये सेना- भाजपमध्ये वाद वाढला; युती फिस्कटणार?)
विकासाचे 'अपडेटेड व्हिजन'
केवळ राजकारणच नाही, तर विकासाचा एक ठोस आराखडा यशराजे यांनी मांडला आहे. त्यांच्या प्रचाराची चार मुख्य सूत्रे आहेत. यामध्ये ग्रामीण भागात अद्ययावत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे. गाव तिथे पक्का रस्ता आणि प्रत्येकाला शुद्ध फिल्टरचे पाणी. शेतात व आजी-आजोबांच्या स्मृतीस्थळावर ओपन जिम, अभ्यासिका आणि महिला रोजगार केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
(नक्की वाचा- Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप, कोण-कोणत्या बँका होणार सहभागी? काय आहेत मागण्या?)
भक्कम राजकीय वारसा
यशराजे यांच्या रूपाने साळुंखे घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.दिवंगत आमदार काकासाहेब साळुंखे हे त्यांचे आजोबा होते. माजी आमदार दीपक साळुंखे हे त्यांचे वडील आहेत.
या अनुभवी वारशामुळे आणि तरुण विचारांच्या जोरावर यशराजे यांनी 'सांगोला तालुका विकास आघाडी'च्या माध्यमातून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world