Mumbai Underground Metro: मुंबई मेट्रो आज मुंबईच्या दळणवळण क्षेत्रातील मैलाचा दगड ठरत आहे. त्यात भुमीगत मेट्रोने मुंबई शहराला वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा तर दिलाच आहे, याशिवाय मुंबई शहराला यामुळे नवी ओळखही मिळाली आहे. मुंबईत 2025 साली भुमीगत मेट्रो पहिल्यांदा धावली, मात्र याचं स्वप्न स्वातंत्र्यपूर्व काळात पाहिलं गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षातच मराठी माणसाने याचा मास्टरप्लान देखील तयार केला. मात्र हे भुमीगत मेट्रोचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी 2025 साल उजाडलं. मात्र यानिमित्ताने मराठमोळे अधिकारी डॉ. पी. जी. पाटणकर यांचं नाव समोर येत आहे.
महापालिकेच्या पुरातत्व खात्यात मिळाली कागदपत्रे
मुंबई महानगरपालिकेच्या हेरिटेज कन्झर्वेशन विभागातील कार्यकारी अभियंता संजय आढाव यांना 1924 मधील 'म्युनिसिपल रिट्रेंचमेंट अँड रिफॉर्म' नावाचा एक अहवाल मिळाला. ज्यात हा आश्चर्यकारक खुलासा झाला आहे. भारताचे महान अभियंता म्हणून ओळखले जाणारे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांनी 1924 मध्ये मुंबईसाठी 12 किलोमीटरच्या वर्तुळाकार इलेक्ट्रिक लाईनची संकल्पना मांडली होती. या लाईनद्वारे बेटावरील शहरातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानके आणि व्यावसायिक केंद्रांना जोडण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता.
मोक्षगुंडम विश्वेश्वरैयांनीही मांडली होती कल्पना
संजय आढाव यांना हा मौल्यवान अहवाल 2023 मध्ये वरळी इंजिनिअरिंग हबमध्ये जुन्या फाइल्सचे संशोधन करताना सापडला. विश्वेश्वरैया यांनी तयार केलेल्या या अहवालात मुंबईतील गर्दीचे रेल्वे आणि रस्ते कॉरिडॉर यांची तुलना लंडन, न्यूयॉर्क, बर्लिन आणि टोकियो यांसारख्या शहरांशी केली होती. त्यांनी निदर्शनास आणले होते की, या शहरांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आधीच भूमिगत किंवा उन्नत रेल्वेमार्ग तयार केले आहेत. विश्वेश्वरैया यांनी प्रस्तावित केलेल्या या भूमिगत लाईनचा खर्च त्या काळात प्रति मैल 33 लाख रुपये इतका प्रचंड होता. याच कारणामुळे हा प्रकल्प 'येत्या काही वर्षांसाठी साकार होण्याची शक्यता नाही' असे म्हणून बाजूला ठेवला गेला.
(नक्की वाचा- Solapur to Mumbai Flight : डबल धमाका, मुंबईसह बंगळुरूही काही मिनिटात गाठता येणार; शेड्यूल, तिकीटदर किती?)
पी. जी. पाटणकर यांची 'मेट्रो ब्लू प्रिंट'
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी, BEST चे तत्कालीन महाव्यवस्थापक पी. जी. पाटणकर यांनी 1957 मध्ये जपान्यांच्या मदतीने 31.9 किलोमीटरच्या भूमिगत मेट्रोची योजना तयार केली. या योजनेत बेटावरील शहरासाठी पाच एकमेकांना जोडलेल्या भूमिगत मेट्रो लाईन्स प्रस्तावित होत्या, ज्यांची एकूण लांबी 31.9 किमी होती. त्यांच्या डिझाइनमध्ये दक्षिण मुंबईच्या फोर्ट भागातून एक वर्तुळाकार मार्ग होता, जो तेव्हाचं व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) येथे सुरू होऊन तिथेच समाप्त होणार होता. याशिवाय व्हीटीला भायखळा, भायखळ्याला सायन ईस्ट आणि भायखळ्याला माहीम वेस्टशी जोडणाऱ्या लाईन्सचा समावेश होता.
Mumbai Metro
पाटणकर यांची दूरदृष्टी
पाटणकर यांनी मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे, ज्यामुळे शहरात गंभीर वाहतूक कोंडी सुरू झाली आहे, याकडे लक्ष वेधले होते. त्यांनी जोर दिला की शहराला जर वाहतूक कोंडीतून वाचवायचे असेल, तर जलद भूमिगत वाहतूक अपरिहार्य आहे. 1960 च्या दशकात प्रकल्पाचा खर्च प्रति किमी सुमारे 17.50 लाख इतका अपेक्षित होता, जो त्यावेळेस परदेशी प्रकल्पांपेक्षा खूप कमी होता. मात्र, तांत्रिक परिपक्वता असूनही हा प्रकल्प भारताच्या तत्कालीन आर्थिक अडचणींमुळे आणि मूलभूत विकास आव्हानांमुळे 'खूप महाग' ठरवून स्वीकारला गेला नाही. 'मिड डे' वृत्तपत्राने याचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पाटणकर आणि सर विश्वेश्वरैयांचे स्वप्न पूर्ण झाले
आज, मुंबईत 'अॅक्वा लाईनचा पूर्णपणे भूमिगत कॉरिडॉर आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (MMRCL) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की, 1924 मध्ये सर विश्वेश्वरैया आणि नंतर 1957 मध्ये डॉ. पी. जी. पाटणकर यांनी पाहिलेल्या या भूमिगत रेल्वेच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याचा भाग होणे, हे माझ्या आणि माझ्या MMRCL टीमसाठी मोठे सौभाग्य आहे. जवळपास 10 वर्षे या स्वप्नासाठी जगून, मुंबईकरांसाठी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतेही कष्ट शिल्लक ठेवले नाहीत. अनेक अडचणींवर मात करून, मुंबईतील नागरिकांच्या पाठिंब्याने हे शक्य झाले, असे भिडे यांनी सांगितले.