जाहिरात

Monorail News: 'त्या' एका चुकीमुळे मोनोरेल बंद पडली, MMRDA ने कारण सांगत दिलं स्पष्टीकरण

एमएमआरडीएने लगेचच टेक्निशीयनची टीम घटनास्थळी रवाना केली होती.

Monorail News: 'त्या' एका चुकीमुळे मोनोरेल बंद पडली, MMRDA ने कारण सांगत दिलं स्पष्टीकरण
मुंबई:

पावसाने मुंबईला आज झोडपून काढले. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यात भर म्हणून की काय मोनोरेल ही अचानक बंद पडली. त्यामुळे त्यात असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. दरवाजे बंद होते. एसी बंद झाला. त्यामुळे प्रवाशांचा जीव गुदमरला होता. शेवटी मोनोच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. मोनोरेल बंद कशी काय पडली याची चौकशी करण्याचे आदेशही तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर आता ही मोनोरेल नक्की कशामुळे बंद पडली याचे कारण समोर आले आहे. 

भक्ती पार्क ते चेंबूर दरम्यान धावणाऱ्या मोनोरेल RST-4 मैसूर कॉलोनी स्टेशन दरम्यान मोनो बंद पडली होती. ही का बंद पडली याचे कारण समोर आले आहे.  प्राथमिक तपासणीत असे आढळून आले की, क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळे मोनोरेल बंद पडली. क्षमते पेक्षा मनोरेलचे  एकूण वजन सुमारे 109 मेट्रिक टनांपर्यंत वाढले होते.  ते तिच्या मूळ क्षमतेपेक्षा अधिक होते. मोनोची एकूण क्षमता 104 टन आहे. या जास्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला. ज्यामुळे मोनोरेलसाठी अत्यावश्यक असलेला वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मोनो बंद पडली. 

नक्की वाचा - Mumbai Monorail: मोनोरेलमध्ये प्रवाशी अडकले, एसी बंद, श्वास गुदमरला, शेवटी काचा फोडून...

एमएमआरडीएने लगेचच टेक्निशीयनची टीम घटनास्थळी रवाना केली होती. मोनो SOP नुसार लगेच दुसरी मोनोही तिथे रवाना करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत दुसऱ्या मोनोमार्फत टो करून किंवा खेचून स्टेशनपर्यंत आणल जातं. पण क्षमतेपेक्षा वजन जास्त असल्याने मोनो खेचून स्टेशनपर्यंत आणता आली नाही. त्यामुळे अग्निशमन विभागामार्फत हे रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं होतं. आजच्या अतिवृष्टीमुळे हार्बर लाईनवरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मोनोरेल स्थानकांवर झाली. सुरक्षा यंत्रणांनी वारंवार आवाहन करूनही अनियंत्रित गर्दी टाळता आली नाही. प्रवासी संख्या अत्यंत वाढली होती.

नक्की वाचा - Dombivali Rain: पावसाचा दणका! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यात कंबरेपर्यंत पाणी

मुंबई मोनोरेल ही मर्यादित क्षमतेची सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. ती विशिष्ट मार्गांसाठीच आहे. पारंपरिक लोकल किंवा मेट्रोसारख्या उच्च क्षमतेच्या तात्काळ गर्दीचा लोड मोनोरेल करून शकत नाही. त्याचे तसे डिझाइन ही केलेले नाही. एमएमआरडीए आपल्या मेट्रो व मोनोरेल प्रणालीमार्फत सुरक्षित व सुगम प्रवास सुनिश्चित करण्यास वचनबद्ध आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आजची घटना ही मुख्यतः अनियंत्रित गर्दीमुळे घडली असून, अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी सुरक्षा व तांत्रिक पथकांच्या सूचनांचे पालन करण्याचे विनम्र आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून सेवा सुरळीतपणे चालू ठेवता येईल, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे. सदर घटनेची तांत्रिक तपासणी सुरु असून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरीता सुधारात्मक उपाय तत्काळ राबविले जात आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com