
अमजद खान
हवामान विभागाने आज मंगळवारी 19 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार रात्री पासून मोठ्या प्रमाणात मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस होत आहे. कल्याण डोंबिवलीतही पावसाने एकच तारांबळ उडवून दिली आहे. डोंबिवली पूर्वीले असलेल्या एमआयडीसी परिसरातील घरे पाण्याखाली गेली आहेत. विशेष म्हणजे याच परिसरात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा बंगला आहे. या बंगल्यातही पावसाचे पाणी शिरले आहे. जवळपास कंबरेपर्यंत पाणी या बंगल्यात शिरले आहे.
डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरातील सुयोग हॉटेल जवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजिव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा बंगला आहे. या बंगल्याचं नाव श्री सदगुरु बंगला असं आहे. कल्याण शीळ परिसरातील एमआयडीसी भागात हा बंगला येतो. या लगतच एक मोठा नाला आहे. या नाल्यात एमाआयडीसीचे प्रदुषीत रसायनं सोडली जातात. त्याचा साफसफाई केली नसल्याचा फटका या परिसरातील नागरिकांना आणि खासदारांना ही बसला आहे.
सकाळा पासून डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे हा नाला ओसंडून वाहू लागला. त्याचं सर्व पाणी लोकांच्या घरात घुसू लागले. गुडघाभर पाणी घरात घुसले होते. कल्याणचे खासदार असलेले श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यातही हे पाणी घुसले. या बंगल्यात खासदार शिंदे हे कधी कधी येत असतात. ते यावेळी घरात नव्हते. याच बंगल्यात पक्षाचे कार्यालय ही आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या बैठकाही याच बंगल्यात होत असतात. या बंगल्याला आता पावसाचा फटका बसलेला दिसत आहे. पाणी काढण्याचे काम सध्या सुरू आहे.
Mumbai Rains Update: मुंबईची लाईफलाईन थाबंली! ठाणे-सीएसएमटी वाहतूक ठप्प; हार्बर सेवाही कोलमडली
2018 साली या परिसरात पाणी शिरले होते. त्यानंतर आता हे पाणी घुसले आहे. नाला सफाईचा प्रश्न या मुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.लोकांनी यामुळे संताप व्यक्त केला आहे. खासदाराचं घर सुरक्षित नाही तर आमच्या सारख्यांचं काय असा प्रश्नही स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. डोंबिलीत सकाळी सात पासून पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शिवाय होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांनी संतापही व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world