रिजवान शेख, प्रतिनिधी
Mumbai News : महाराष्ट्रातील मराठी शाळांची अवस्था चिंतेचा विषय ठरत आहेत. इतर खासगी शाळांच्या तुलनेत मराठी शाळा आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोठा दिलासा तर देतातच शिवाय मराठी भाषा टिकविण्यासाठी मराठी शाळा टिकवणं आवश्यक असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान मुंबईतील घाटकोपरमधील पालिकेची एक मराठी शाळा पाडण्यात आल्यानंतर त्याजागी खासगी शाळा उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. अशावेळी या मराठी शाळेला वाचविण्यासाठी स्थानिक लोक एकवटले आहेत. मुंबई येथील घाटकोपर परिसरातील पंतनगर येथील मुंबई महापालिकेची शाळा क्रमांक ०२ तोडून ती जागा पालिकेने खाजगी संस्थेला देण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाच्या विरोधात सकल मराठी समाज मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी पंतनगरमधील नागरिकांनी विरोधाची तलवार उपसली आहे.
शाळा महानगरपालिकेला द्या, खासगी संस्थेला देऊ नये..सकल मराठी समाजाची मागणी
घाटकोपर परिसरातील पंतनगर येथील स्वामी समर्थ मठाच्या बाजूला मुंबई महानगरपालिकेची शाळा क्रमांक ०२ ही जागा खाजगी विकासकाला 30 वर्षाच्या भाडेपट्टा तत्वावर देण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ज. मो. अभ्यंकर यांना मुंबई महानगरपालिकेने 30 वर्षासाठी ही शाळा लीजवर दिली आहे. सकल मराठी समाज यांची मागणी आहे की, मुंबई महापालिकेची जागा खाजगी संस्थेला न देता तिथे महापालिकेची शाळा असावी या मागणीसाठी स्थानिक सकल मराठी समाज आग्रही आहेत.
खाजगी विकासकांनी सीबीएससी आणि आयसीएसई सारख्या महागड्या शाळा बांधाव्यात, मात्र मुंबईसारख्या शहरांमध्ये जे गोरगरीब विद्यार्थी या शाळा क्रमांक ०२ मध्ये शिकत होते, त्यांच्यासाठी मराठी शाळा बांधावी अशी मागणी सकल मराठी समाजाकडून करण्यात आली आहे.
पंतनगर येथील शाळा क्रमांक ०२ ही जागा खाजगी संस्थेला न देता तिथे महापालिकेचीच शाळा बांधावी जर महापालिकेला होत नसेल तर आम्ही सकल मराठी समाज शाळा बांधून देतो आणि त्या ठिकाणी मराठी शाळा पुन्हा सुरू करावी अशी आमची त्यांना विनंती आहे. त्याचबरोबर शाळा बांधण्यासाठी लागणारा खर्च देखील सकल मराठी समाज यांच्या माध्यमातून केला जाईल. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही हा मुद्दा उचलून धरू आणि विधानभवनाच्या समोर आंदोलन देखील करू असा इशारा सकल मराठी समाज यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मुंबई महानगरपालिका घाटकोपर पंतनगर शाळा क्र २ आणि मराठी अभ्यास केंद्राची भूमिका
पटसंख्या कमी झाली या कारणास्तव घाटकोपर पूर्व येथील पंतनगर शाळा क्र २ ही मुंबई महानगरपालिकेची शाळा तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आली आहे. कमी पटसंख्येच्या शाळांच्या जागा खाजगी संस्थांना ३० वर्षांच्या भाडेकरारावर देऊन महसूलात वाढ करावी, असे धोरण मुंबई महानगरपालिकेने स्वीकारलेले आहे. त्या धोरणाचा भाग म्हणून जवळपास आठ शाळांच्या जागा मुंबई महानगरपालिकेने खाजगी संस्थाना दिलेल्या आहेत, असं सकल मराठी समाजाकडून सांगितलं जात आहे.
त्यातील घाटकोपर पंतनगर शाळा क्र २ या एका शाळेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या निर्मल एज्युकेशन सोसायटी या संस्थेला देण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत त्या जागेचे भूमीपूजन झाले आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेची जागा खाजगी संस्थेला न देता तिथे महापालिकेचीच शाळा असावी या मागणीसाठी स्थानिक मंडळी आग्रही आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world