Rice Storage Danger: उंदीर आणि कीटकांपासून धान्याचे रक्षण करण्यासाठी घरात ठेवलेले कीटकनाशक एका दोन वर्षांच्या चिमुकलीसाठी जीवघेणे ठरले आहे. गिरगाव येथील एका दोन वर्षांच्या चिमुकलीला तांदळाच्या डब्यात ठेवलेल्या विषारी कीटकनाशकाचा वास श्वासावाटे पोटात गेल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या ही चिमुकली अतिदक्षता विभागात (ICU) मृत्यूशी झुंज देत आहे.
हाजी अली येथील एनएच एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 15 तासांच्या कालावधीत या चिमुकलीला तीन वेळा कार्डिअॅक अरेस्टचा सामना करावा लागला.
उलट्या आणि जुलाबामुळे झाली दाखल
शनिवारी (13 जून) रात्री या मुलीला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. सलग दोन दिवस उलट्या आणि जुलाब होत असल्याने शरीरातील पाणी प्रचंड प्रमाणात कमी (डिहायड्रेशन) झाले होते. तिच्या मोठ्या बहिणीलाही अशाच पद्धतीचा त्रास झाला होता, पण ती दोन दिवसांत बरी झाली.
(नक्की वाचा : Frequent Urination: सतत लघवीला होतेय? गंभीर आजाराचा धोका वेळीच ओळखा, अन्यथा 1 चूक तुम्हाला ICUमध्ये पोहोचवेल)
असा समोर आला कीटकनाशकाचा अँगल
मुलीची प्रकृती खालावत गेल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाकडे अधिक चौकशी केली. तेव्हा घरात साठवलेल्या तांदळामध्ये उंदीर आणि इतर कीटकांपासून संरक्षण व्हावे म्हणून डब्यात कीटकनाशकाची पुडी ठेवल्याची बाब समोर आली. यावरून 'ॲल्युमिनियम फॉस्फाइड'चा अंदाज वर्तवला जात आहे. या कीटकनाशकाचा उग्र आणि विषारी वास श्वासावाटे मुलीच्या पोटात गेल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा : Von Willebrand Disease: महिलांनो सावधान! किरकोळ दुखापतीनंतरही रक्त थांबत नाहीय? तर असू शकतो हा धोकादायक आजार)
एप्रिल महिन्यामध्ये कलिंगड खाल्ल्याने झाला होता 4 जणांचा मृत्यूमुंबईत अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. एप्रिल महिन्यात मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील 4 सदस्यांचा कलिंगड खाल्ल्याने मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता गिरगावमधील हे नवीन प्रकरण समोर आले आहे. पायधुनी येथील घटनेत नंतर तपासादरम्यान त्या कलिंगडमध्ये 'झिंक फॉस्फाइड' या उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश आढळले होते तसेच मृतांच्या व्हिसेरा नमुन्यांमध्येही झिंक फॉस्फाइडचे अंश दिसून आले होते.
घरात धान्य साठवताना किंवा उंदीर मारण्याची औषधे ठेवताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, अन्यथा अशा विषारी औषधांचे केवळ अंश किंवा वासही लहान मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.